
नमाज पठण करून रोजा सोडण्यासाठी निघालेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात घडली आहे. हुसेन खान असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी हल्ला करणाऱ्या हल्लेखोर शाहरुख शेखविरोधात वागळे इस्टेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हुसेन खान हा रमजान महिना सुरू असल्याने नमाज पठण करण्यासाठी हाजुरी येथील दर्ग्यामध्ये गेला होता. नमाज पठण झाल्यानंतर तो रोजा सोडण्यासाठी घरी जात असताना शाहरुख शेख याने त्याच्या डोक्यावर फावडय़ाने हल्ला केला. या हल्ल्यात हुसेनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर महावीर जैन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर शाहरुख फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी वागळे इस्टेट पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.