समस्यांचे निराकरण करण्यासाठी गेलेल्या 25 वर्षीय तरुणीसोबत भोंदूबाबाने अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. अरविंद जाधव असे या अघोरी भोंदूबाबाचे नाव असून तो आंबिवलीजवळील मोहने परिसरात राहतो. त्यानंतर घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या कुटुंबियांसोबत वाईट करेन, अशी धमकी तरुणीला दिली होती.
घरघुती समस्यांचे निराकरण करण्यासाठी पीडित तरुणी नातेवाईकांसोबत भोंदूबाबा अरविंदकडे गेली होती. त्या वेळी अरविंद याने ‘तू खूप तणावात आहेस, काळजी करू नको, तुझे सगळे टेन्शन मी दूर करतो’ असे सांगत नातेवाईकांना बाहेर थांबण्यास सांगितले. त्यानंतर या विकृताने तिच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्याला पीडित तरुणीने विरोध केला असता, त्याने तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे नुकसान होईल, अशी धमकी तिला दिली. या प्रकरणी तरुणीने खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.