
पश्चिम बंगालमध्ये एका बुकीची हत्या करून मुंबईत पळून आलेल्या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या युनीट-1च्या पथकाने पकडले. आरोपी लोणावळ्यात मजुरीचे काम करत होता आणि वांद्र्याच्या खेरवाडी येथे राहत होता. त्याला पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
पश्चिम बंगालचा स्थानिक बुकी मिथुन चक्रवर्ती यांची पाच जणांनी हत्या केली होती. त्या प्रकरणी बन्सीहारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुह्यात एकाला अटक झाली होती. तर अन्य आरोपी रबिऊल मिआह ऊर्फ बाबू (34) हा खेरवाडी परिसरात राहत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनीट-1 च्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून बाबूला उचलले. चौकशीत त्याने गुह्यांची कबुली दिली. पश्चिम बंगाल पोलिसांना याबाबत अवगत करण्यात आले असून त्याला लवकरच त्या पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येईल. गुन्हा करून महाराष्ट्रात पळून आल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून तो लोणावळ्यात एका बांधकामाच्या ठिकाणी मंजुरी करत होता. त्यानंतर जानेवारी महिन्यात तो खेरवाडी येथे राहण्यासाठी आला होता.