दक्षिण बंगालमधील गंभीर पूरस्थितीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका पत्राद्वारे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधले आहे. दामोदर व्हॅली प्रकल्पाच्या धरणांमधून पाणी सोडण्यात आल्यामुळे द. बंगाल पुरामध्ये बुडाले असल्याचा आरोप ममता यांनी केला आहे. केंद्राने मदतीसाठी तातडीने पावले न उचलल्यास दामोदर व्हॅली प्रकल्प करारातून बाहेर पडू, असा इशाराही त्यांनी मोदी यांना लिहिलेल्या पत्रात दिला आहे.
दामोदरच्या मालकीच्या आणि देखरेखीखालील मॅथॉन आणि पंचेत धरणांच्या संयुक्त प्रणालीतून एकाचवेळी कुठल्याही नियोजनाविना आणि पूर्वसूचनेशिवाय 5 लाख क्युसेक पाणी सोडण्यात आल्यामुळे पूर्व वर्धमान, पश्चिम वर्धमान, बीरभूम, बांकुरा, हावडा, हुगळी, पूर्वा मेदिनीपूर आणि पश्चिम मेदिनीपूर या जिह्यांतील खूप मोठ्या परिसराला पुराचा तडाखा बसला आहे, असे ममता यांनी पत्रात म्हटले आहे. या पुरामुळे पिकांचे, रस्ते, पूल आदी पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, हजारो घरे व जनावरे नष्ट झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.