केंद्र सरकार मनरेगासाठी निधी देत नसल्याचे समोर आले आहे, परंतु आम्हीही त्यांच्यापुढे भीक मागणार नाही. आम्ही ‘कर्मश्री’ योजना सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून लाखो लोकांना लाभ मिळत आहे, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ममता बॅनर्जी यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी देशासाठी योजना आयोगाची स्थापना केली होती, परंतु ही योजना सरकारने संपवून टाकली. हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. त्यांची जन्मतारीख माहीत आहे, परंतु त्यांच्या मृत्यूचे रहस्य अद्यापि कायम आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी 30हजार
लोकांसाठीच्या विविध योजनांचे लोकार्पण केले.
चहाच्या मळ्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना 438 घरे उपलब्ध करून देण्यात आली. याशिवाय धूपगुडी येथे अनेक विकास प्रकल्पांच्या कामांना ममता बॅनर्जी यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. दरम्यान अतिक्रमणे हटवण्याबाबतही ममता बॅनर्जी यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. सर्वांगीण विकासाचे सरकारचे ध्येय आहे. त्यामुळे अतिक्रमणे हटवण्यात यावीत असे त्या म्हणाल्या.