पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायदा लागू होणार नाही, ममता बॅनर्जी यांचा केंद्राशी पंगा

पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कुठल्याही परिस्थितीत लागू होणार नाही, अशी घोषणा करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केंद्र सरकारला आव्हान दिले. सरकार राज्यभरातील अल्पसंख्याक समुदायाचे आणि त्यांच्या संपत्तीचे रक्षण करेल, अशी हमीदेखील त्यांनी दिली. कोलकात्यात जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

वक्फ कायदा लागू झाल्यामुळे तुम्ही खूप दुःखी आहात हे मला माहीत आहे. परंतु, पह्डा आणि राज्य करा असे बंगालमध्ये काहीच होणार नाही याची खात्री बाळगा, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या, वक्फ सुधारणा विधेयक आता मंजूर करायला नको होते. यावर जोर देतानाच राजकीय आंदोलन करण्यासाठी भडकावणाऱया लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका असे आवाहनही त्यांनी केले. मुर्शिदाबाद जिह्यात वक्फ सुधारणा कायद्याविरोधात मंगळवारी झालेल्या हिंसाचाराही ममता बॅनर्जी यांनी उल्लेख केला. त्या म्हणाल्या, बांगलादेशातील सीमेवरील परिस्थिती पहा. वक्फ सुधारणा विधेयक आता मंजूर करायला नको होते. बंगालमध्ये आमच्याकडे 33 टक्के अल्पसंख्याक आहेत, त्यांचे मी काय करणार? असा सवालही ममता बॅनर्जी यांनी सरकारला उद्देशून केला.

दीदी आहे तोपर्यंत तुमचे रक्षण करणार

लक्षात ठेवा दीदी इथे आहे तोपर्यंत तुमचे आणि तुमच्या संपत्तीचे रक्षण करणार, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. बंगाल, बांगलादेश, पाकिस्तान आणि भारत सर्व एक होते हे इतिहासच सांगतो. विभाजन नंतर झाले. येथे जे लोक रहात आहेत त्यांना संरक्षण देणे आमचे काम आहे. लोक एकजुटीने राहिले तर ते जग जिंकू शकतात. काही लोक एकत्र येऊन आंदोलन सुरू करण्यासाठी भडकावतील. कृपया असे करू नका असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

मला गोळी घातली तरी एकतेपासून वेगळे करू शकणार नाही

मी सर्व धर्मांशी संबंधित प्रार्थना स्थळांवर जाते आणि यापुढेही जाणार असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. मला तुम्ही गोळी घातली तरीही एकतेपासून वेगळे करू शकणार नाही. प्रत्येक धर्म, जात, पंथ सर्वजण मानवतेसाठी प्रार्थना करतात आणि आपण त्यांच्यावर प्रेम करतो असेही त्या म्हणाल्या. मी दुर्गा पूजा, काली पूजा, जैन आणि बौद्ध मंदिर, गुरुद्वारा, चर्च आणि गुरु रविदास मंदिरातही जाते. राजस्थानमध्ये मी अजमेर शरीफ यांच्या दर्ग्यासह पुष्कर येथे ब्रह्म मंदिरातही गेले होते, अशी आठवण ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितली.

जम्मू-कश्मीरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी गदारोळ

जम्मू -कश्मीर विधानसभेत सलग तिसऱया दिवशी वक्फ कायद्यावरील चर्चेच्या मागणीवरून प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करावे लागले. वक्फ कायद्यावर स्थगन प्रस्ताव आणून याबाबत सभागृहात चर्चा करण्याची मागणी नॅशनल कॉन्फरन्ससह सहकारी पक्षांनी लावून धरली, परंतु विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे विरोधकांनी आणखी गदारोळ केला. अखेर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.