बांगलादेशींनी हिंसाचार केला तर तुम्ही त्यांना सीमेवर का रोखलं नाही? ममता बॅनर्जींचा केंद्रावर निशाणा

पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायदा कुठल्याही परिस्थितीत लागू होणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी बुधवारी वक्फ कायद्याबाबत इमामांना संबोधित केले. यावेळी त्यांनी बंगालची बदनामी होत असल्याचा आरोप केला.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इमामांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. यूपी आणि बिहारचे व्हिडिओ दाखवून बंगालची बदनामी केली जात आहे. खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. भाजप खोटे व्हिडिओ दाखवून बदनामी करत आहे. मी हात जोडून इमामांना शांततेचे आवाहन करते, असे ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.

सीमा सुरक्षा ही बीएसएफची जबाबदारी आहे. तुम्हाला बंगालबद्दल बोलायचे असेल तर माझ्याशी, माझ्यासमोर बोला. बंगालला बदनाम करण्यासाठी बनावट मीडिया रिपोर्ट्स आम्हाला आढळले आहेत. मी सर्व इमाम आणि धर्मगुरूंचा आदर करते. आम्ही रवींद्रनाथ टागोरांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवतो. त्यामुळे बंगालमध्ये हिंसाचार भडकवण्याचा भाजपचा कट आहे. त्यामुळे यात कोणीही अडकू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

वक्फ सुधारणा विधेयक आता मंजूर करायला नको होते. वक्फ कायदा मंजूर करण्याची इतकी घाई का केली? तुम्हाला बांगलादेशातील परिस्थितीची जाणीव नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भाजपने बाहेरून लोकांना बोलावून हिंसाचार घडवला आहे. वक्फबाबत लोकांना भडकावले गेले. मुर्शिदाबादमधील हिंसाचार हा देखील एक नियोजित कट होता. बांगलादेशींनी हिंसाचार केला तर तुम्ही त्यांना सीमेवर का रोखले नाही? घुसखोरांना का येऊ दिले गेले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आम्ही हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पडू देणार नाही. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी वक्फवर कोणतेही भाष्य केलेले नाही. हे लोक वक्फवर गप्प का आहेत? या लोकांना फक्त सत्तेची पर्वा आहे. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आम्ही हिंदू आणि मुस्लिम वाद होऊ देणार नाही. भाजप सत्तेत आला तर ते लोकांचे खाणे मुश्किल करतील, असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी केला.

पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायदा लागू होणार नाही, ममता बॅनर्जी यांचा केंद्राशी पंगा