
दिल्लीतील नीती आयोगाच्या बैठकीला आवर्जून उपस्थित राहिलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. केंद्र सरकारने राज्य सरकारांमध्ये जाणीवपूर्वक भेदभाव केला. अन्य राज्यांतील मुख्यमंत्र्यांना बोलण्यासाठी जास्त वेळ दिला. मात्र, आपल्याला बोलण्यासाठी पुरेसा वेळ दिला नाही. अवघ्या पाच मिनिटांत माईक बंद केला, असा गंभीर आरोप करत ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त करत बैठक अर्ध्यावर सोडून निघून गेल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. नीती आयोगाच्या बैठकीत माझ्या आधीचे लोक 10 ते 20 मिनिटे बोलले. परंतु, मला केवळ 5 मिनिटे बोलू दिले. त्यानंतर माझा माईक बंद करण्यात आला, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. विरोधी पक्षातील मी एकमेव सदस्य होते. जी या बैठकीला उपस्थित होते. परंतु, तरीही मला बोलण्याची परवानगी नाकारण्यात आली. हे खरोखर अपमानजनक होते, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. या बैठकीत अपमान झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी नीती आयोगाची बैठक अर्ध्यावर सोडली.
पुन्हा योजना आयोग आणा
नीती आयोग कशाला हवाय? नीती आयोगाची केवळ बैठक बोलावली जाते. त्याशिवाय, या बैठकीत दुसरे काहीच होत नाही. नीती आयोग रद्द करून योजना आयोग पुन्हा आणला जावा, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
पाच मिनिटांत माईक बंद केले
मी बोलत असताना माझा माईक बंद करण्यात आला. मी त्यांना विचारले, माझा माईक का बंद केला? तुम्ही असा भेदभाव का करता? हा केवळ पश्चिम बंगालचा अवमान नाही, तर संपूर्ण प्रादेशिक पक्षांचा अवमान आहे.