शिवरायांचा नवा पुतळा उभारण्यासाठी मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवा पुतळा उभारण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. नवीन पुतळ्याची संकल्पना आणि कार्यपद्धती काय असावी त्यासंदर्भात ही समिती शिफारस करणार आहे.

या समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे हे सदस्य सचिव आहेत. तसेच सदस्य म्हणून नौदलाचे कमांडर एम. दोराईबाबू, आयआयटी मुंबईतील स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग क्षेत्रातील तज्ञ प्रा. जांगीड, मेटलर्जी इंजिनीअरिंग व मटेरियल सायन्स क्षेत्रातील तज्ञ डॉ. परीदा, सर जे. जे. स्पूल ऑफ आर्टस्चे संचालक राजीव मिश्रा, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज व मराठा आरमाराचे अभ्यासक राजे रघुजी आंग्रे यांचा या समितीमध्ये समावेश आहे. इतिहासकार जयसिंगराव पवार यांचा विशेष निमंत्रित म्हणून या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. समितीने नेमून दिलेले काम तातडीने हाती घेऊन आपला अहवाल लवकरात लवकर सादर करावा असे निर्देश शासनाने दिले आहेत.