मुंबई पोलीस वाहनचालक लेखी परीक्षेत कॉपी करणाऱया तरुणाला ओशिवरा पोलिसांनी अटक केल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी पाचजणांविरोधात कांदिवली, टिळकनगर, कस्तुरबा मार्ग आणि व्ही.पी. रोड पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले. व्हिजिटिंग कार्ड, ब्लू टूथ आणि बनावट हॉल तिकिटाचा वापर करून ते आज परीक्षा देणार होते. गुन्हा नोंद झालेल्यामध्ये दोन तरुणींचा समावेश आहे. ते बीड व संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. लेखी परीक्षेत आतापर्यंत मुंबईत सहा गुन्हे नोंद झाले आहेत.
मुंबई पोलीस दलात वाहनचालक, पोलीस शिपाई पदासाठी भरती घेण्यात येत आहे. मैदानी भरतीला पात्र झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. लेखी परीक्षेदरम्यान कॉपीचे प्रकार होऊ नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली होती. बोरिवली पूर्व येथील केंद्रात एका उमेदवाराकडे ब्लू टूथ आढळले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दुसरीकडे चेंबूर येथे एक खासगी महाविद्यालय आहे. लेखी परीक्षेसाठी पात्र असलेले उमेदवार तेथे आले. गेटवर उमेदवारांची तपासणी करून त्यांना सोडले जात होते. तेव्हा दोन उमेदवारांची तपासणी केली. त्याच्याकडे व्हिजिटिंग कार्डसारखे डिव्हाईस मिळून आले. पोलिसांनी ते डिवाइस उघडले. त्यात सिमकार्ड, बॅटरी आणि एअरपीसने जोडले होते. त्याने ते डिव्हाईस शरीराच्या एका भागात लपवले होते. परीक्षा केंद्रात आत गेल्यानंतर तो डिवाइसचा वापर करणार होता. त्या दोन्ही विद्यार्थ्यांना मैदानी परीक्षेत चांगले गुण मिळाले होते. मेरिटच्या नादात त्याने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे.
मैदानी परीक्षेत पास झाल्याची खोटी माहिती
कांदिवली येथील शाळेत लेखी परीक्षा आयोजित केली होती. आज एक उमेदवार परीक्षेसाठी आला. गेटवर त्याच्या हॉल तिकिटाची तपासणी केली. ते हॉल तिकीट बनावट असल्याचे समजले. तो मैदानी परीक्षेत नापास झाला होता. त्याने कुटुंबीयांना मैदानी परीक्षेत पास झाल्याची खोटी माहिती दिली होती. त्यानंतर तो आज सकाळी परीक्षेसाठी आत जात होता. कांदिवली पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला.
मैत्रिणीचे हॉल तिकीट केले एडिट
गिरगाव येथे एका केंद्रावर परीक्षा आयोजित केली होती. त्या केंद्रात एक युवती परीक्षेसाठी आली. गेटवर तिच्या हॉल तिकिटाची तपासणी केली. ते हॉल तिकीट रंगीत झेरॉक्स असल्याचे समजले. तिने त्याच्या लेखी परीक्षेला पात्र झालेल्या मैत्रिणीचे हॉल तिकीट एडिट करून स्वतःचा फोटो चिटकवला होता. या प्रकरणी तिघांविरोधात व्ही.पी. रोड पोलिसांनी गुन्हा नोंद केला.