उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या विधानावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. असे विधान कुणी साधू किंवा एखादा नाथ संप्रदायाची व्यक्ती बोलू शकत नाही. असे केवळ एखादा दहशतवादीच बोलू शकतो, अशा शब्दांत खरगे यांनी योगींवर जळजळीत टीकास्त्र सोडले. तसेच हम डरेंगे तो मरेंगे, पण आम्ही घाबरणारे नाही, असेही ते म्हणाले.
झारखंडमध्ये पलामूमध्ये छत्तरपूर विधानसभा क्षेत्रातील एका सभेत खरगे बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक है तो सेफ अशी घोषणा करतात तर योगी आदित्यनाथ बटेंगे तो कटेंगे असे विधान करतात. दोन्ही नेते आपापल्या भाषणात विरोधाभास असलेली वक्तव्य करत असून दोघांनी आधी ठरवावे की देशात नेमकी कोणती घोषणा लागू करावी, जेणेकरून देशातील जनतेमध्ये कोणताही संभ्रम राहाणार नाही, असा सणसणीत टोलाही खरगे यांनी लगावला. मोदी यांचा उद्देश देशातील एकता संपवणे हा असून केवळ सत्ता राखण्यासाठी ते अशाप्रकारच्या घोषणा देत आहेत. देशातील लोकांमध्ये फूट पाडून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचाच त्यांचा हेतू आहे. मोदी आणि योगींच्या घोषणा म्हणजे एकप्रकारची दादागिरी असल्याचा आरोपही खरगे यांनी केला.
सगळीकडे बेरोजगारांची गर्दी
भाजपचे सरकार आल्यास पक्की नोकरी देऊ, असा प्रचार करत नरेंद्र फिरतआहेत. परंतु, महाराष्ट्र, गुजरात असो किंवा उत्तर प्रदेश सगळीकडे बेरोजगारांचीच गर्दी सित आहे, ही वस्तुस्थिती आहे, असे मल्लिकार्जून खरगे म्हणाले. विशेष म्हणजे ही अशी राज्ये आहेत जिथे भाजपचे सरकार आहे. परंतु, नरेंद्र मोदी येथील तरुणांना पक्की नोकरी देण्याबाबत बोलत नाहीत,याकडेही खरगे यांनी लक्ष वेधले.