काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी मध्य प्रदेशातील महू येथे ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅलीला संबोधित केले. यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला. गंगास्नान केल्याने गरिबी नष्ट होणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कुंभस्नानासाठी कुटुंबासह प्रयागराजला गेले असतानाच खरगे यांनी जबरदस्त टोला भाजप नेत्यांना लगावला आहे.
अमित शहा यांनी कुटुंबासह प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात गंगनदीत स्नान केले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अनेक संतही त्यांच्यासोबत होते. याआधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही प्रयागराजला गेले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही प्रयागराजला येणार आहेत. याबाबत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, गंगास्नान करण्यासाठी भाजप नेत्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. गंगेत डुबकी मारून गरिबी दूर होणार नाही, पण मला कोणाच्याही श्रद्धेला धक्का लावायचा नाही, असेही खरगे यांनी स्पष्ट केले.