Lok Sabha Election 2024 : ध्यान लावून ज्ञान येत नाही, गांधीजींबाबत PM मोदींचं वक्तव्य आश्चर्यकारक; खरगेंचा घणाघात

लोकसभा निवडणुकीचा प्राचर आज संपणार आहे. प्रचाराच्या अखेरीस काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक सवाल उपस्थित केले आहेत. तसेच पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेल्या वक्तव्याचाही मल्लिकार्जुन खरगे यांनी समाचार घेतला. चित्रपट आला म्हणून महात्मा गांधी जगाला कळले, असे पंतप्रधान मोदी काल म्हणाले. पंतप्रधान शिकलेले असते किंवा वाचलं असतं तर ते असे बोलले नसते. त्यांचे वक्तव्य आश्चर्यकारक आहे, असा घणाघात खरगे यांनी केला.

पंतप्रधानांना महात्मा गांधींबद्दलच माहिती नाही तर त्यांना संविधानातीही माहिती नसेल. 4 जून नंतर त्यांनी महात्मा गांधींचे आत्मचरित्र आणि माई एक्सपेरिएन्सेस विथ ट्रुथ हे नक्की वाचावं, असा जोरदार टोला खरगे यांनी मोदींना लगावला.

मोदींचे राजकारण द्वेषाने भरलेले आहे, अशी सडकून टीका खरगेंनी केली. आज संध्याकाळी निवडणूक प्रचार संपतोय. 18व्या लोकसभेची ही निवडणूक दीर्घकाळ स्मरणात राहील. देशातील प्रत्येक नागरिक जाती, धर्म, पंथापासून वर येऊन एकजूट झाला आहे. आम्ही मुद्द्यांवर मतं मागितली आहेत, असे आवाहन खरगे यांनी जनतेला केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विवेकानंद केंद्र येथे ध्यानधारणेसाठी जात आहेत. यावरूनही मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींना चिमटा काढला. विवेकानंद केंद्रात ध्यानधारणा केल्याने किंवा गंगा नदीत स्नान केल्याने ज्ञानप्राप्ती होत नाही. त्यासाठी शिक्षण घ्यावे लागते. मोदींनी गेल्या 15 दिवसांत 232 काँग्रेसचे नाव घेतले. 758 वेळा स्वतःचे नाव घेतले. तर 573 वेळा इंडिया आघाडी आणि विरोधी पक्षांवर बोलले. पण महागाईचा साधा उल्लेखही केला नाही. ‘इंडिया’ आघाडी एकजुटीने आणि निर्भीड होऊन निवडणूक लढवली, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.