
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड आणि भाजप यांच्या युतीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज जोरदार हल्ला चढवला. बिहारच्या बक्सर येथे घेतलेल्या जाहीर सभेत त्यांनी या युतीवर निशाणा साधला. मोदी आणि नितीश कुमार यांची युती ना देशहितासाठी ना बिहारच्या विकासासाठी आहे. ही तर संधीसाधूंची युती आहे, असा आरोप खरगे यांनी केला.
‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ असा नारा देत काँग्रेसने जाहीर सभा घेतली. या सभेला खरगे यांनी संबोधित केले. आगामी निवडणुकीत एनडीएला विधानसभा निवडणुकीच्या बाहेर ठेवा, त्यांना मतदान करू नका, असे आवाहन खरगे यांनी केले. 100 दिवसांत विदेशातून काळा पैसा परत आणणार असे आश्वासन मोदींनी दिले होते त्याचे काय झाले, असा सवाल खरगे यांनी केला. तसेच त्यांच्या खोटेपणाची यादीच त्यांनी जनतेसमोर ठेवली. सगळय़ांच्या खात्यात 15 लाख रुपये टाकणार, दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार, पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक गॅसच्या किमती कमी करणार, 2022 पर्यंत गंगेची साफसफाई करणार, शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणार, 2022 पर्यंत सर्वांना पक्की घरे मिळणार, हवाई चप्पल घालणाऱयांना विमानात फिरवणार, शेतकऱयांना हमीभावाची गॅरंटी, देशातील महागाई संपवणार, ‘मेक इन इंडिया’अंतर्गत नवीन कारखाने उघडणार या आश्वासनांचे काय झाले, असे खरगे म्हणाले.