![mallikarjun kharge](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/01/mallikarjun-kharge-696x447.jpg)
अमेरिकेतून हद्दपार केलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना अमानुष वागणूक मिळाली. पंतप्रधान मोदींनी त्यांचे ‘जुने मित्र’ डोनाल्ड ट्रम्प यांना फोन करून हिंदुस्थानी नागरिकांना अशा प्रकारे परत पाठवू नये अशी विनंती करायला हवी होती. मोदी ट्रम्प यांच्याशी चर्चा करणार असून त्याचा देशाला फायदा होईल, असे त्यांनीच सांगितले. मात्र ते जर खरोखरच ट्रम्प यांचे जवळचे मित्र असते तर मोदींनी ट्रम्प यांना फोनवरून हिंदुस्थानी स्थलांतरित कामगारांना अशा प्रकारे देशाबाहेर काढू नये असे सांगायला हवे होते, असा हल्ला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी चढवला. दरम्यान, मोदी सध्या परदेश दौऱयावर असून अमेरिकेच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जातील आणि ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय मुद्दय़ांवर चर्चा करतील.
हिंदुस्थानींना मालवाहू विमानातून आणले
खरगे म्हणाले की, हिंदुस्थानी नागरिकांना मालवाहू विमानातून मायदेशात आणण्यात आले आणि अतिशय वाईट वागणूक देण्यात आली. स्थलांतरितांना प्रवासी विमानाद्वारे पाठवण्यास मोदींनी सांगितले नाही. हिंदुस्थानातूनही कोणत्या विशेष विमानाची व्यवस्था केली नाही. यावरून मोदींच्या ट्रम्प यांच्यासोबतच्या जवळच्या मैत्रीचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट होते असे खरगे म्हणाले.