पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने तातडीने पावले उचलायला हवी होती, मात्र तसं झालं नाही; सर्वपक्षीय बैठकीत खर्गे यांनी मांडला मुद्दा

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. याचदरम्यान, केंद्र सरकारने आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली ज्यामध्ये लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सर्व विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने तातडीने पावले उचलायला हवी होती, मात्र तसं झालं नाही, असा मुद्दा मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडला. ज्यावर सर्व पक्ष प्रतिनिधींनी या मुद्द्यावर सहमती दर्शवली, अशी माहिती खर्गे यांनी X वर पोस्ट करत दिली आहे.

या बैठकीनंतर X वर पोस्ट करत मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, “पंतप्रधानांनी इतक्या महत्त्वाच्या बैठकीत उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे, कारण ते जो काही निर्णय घेतील तो अंतिम असेल. परंतु पंतप्रधान या बैठकीत उपस्थित नव्हते. आजच्या सर्वपक्षीय बैठकीत पहलगाममध्ये त्रिस्तरीय सुरक्षा असूनही, सुरक्षेत त्रुटी कशा निर्माण झाल्या ज्यामुळे अनेक निष्पाप लोकांचा जीव गमवावा लागला, यावर सखोल चर्चा झाली. गेल्या तीन दिवसांत एक हजार पर्यटकांनी पहलगामला भेट दिली आहे, अशा परिस्थितीत पोलिसांना याची जाणीव असायला हवी होती आणि त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करायला हवी होती. जम्मू-काश्मीरची सुरक्षा आणखी कशी मजबूत करता येईल, यावरही बैठकीत चर्चा झाली.”