
दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सर्वजण सरकारसोबत आहेत. दहशतवाद्यांना योग्य उत्तर द्यावे लागेल, असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले आहेत. मंगळवारी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतेक पर्यटक होते. यावरच आपली प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले आहेत. खर्गे म्हणाले की, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावून यावर काय उपाय करावा, याबद्दल चर्चा करायला हवी.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, “पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांच्या हत्येमुळे आम्हाला खूप दुःख झालं. काँग्रेस पक्ष या भ्याड कृत्याचा तीव्र निषेध करते. हा हल्ला आपल्या देशाच्या एकता आणि अखंडतेवरचा भ्याड हल्ला आहे.”
खर्गे पुढे म्हणाले, ‘वर्ष 2000 मध्ये झालेल्या चित्तीसिंगपोरा हत्याकांडानंतर हा हल्ला दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांनी केलेल्या सर्वात क्रूर हल्ल्यांपैकी एक आहे. आम्ही पुन्हा एकदा सांगतो की, निःशस्त्र आणि निष्पाप नागरिकांना मारणारे मानव असू शकत नाहीत.”
ते म्हणाले की, त्यांनी बुधवारी संध्याकाळी उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशीही चर्चा केली. तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक गुरुवारी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीत होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.