पंतप्रधान मोदींनी माफी मागावी, मल्लिकार्जुन खरगे यांची मागणी; राज्यसभेत नेमकं काय घडलं? जाणून घ्या

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आरक्षणाबाबत राज्यांना लिहिलेल्या पत्राबाबत तथ्यांचा विपर्यास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्यसभेत ‘राज्यघटनेचा 75 वर्षांचा गौरवशाली प्रवास’ या विषयावरील चर्चेत भाग घेताना खरगे यांनी ही मागणी केली आहे.

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, ”श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासह संविधान सभेच्या सदस्यांनी पहिली दुरुस्ती केली होती. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींना आरक्षण, शिक्षण, नोकऱ्यांशी संबंधित समस्या आणि जमीनदारी रद्द करण्याची मागणी केली होती.”

खरगे पुढे म्हणाले, मी सभागृहाला कळवू इच्छितो की, सर्वोच्च न्यायालयाने मद्रास राज्याचा आरक्षणाचा निर्णय फेटाळला आहे. ते म्हणाले की, सरदार पटेल यांनी 3 जुलै 1950 रोजी नेहरूंना लिहिलेल्या पत्रात असे सुचवले होते की, या समस्येवर घटनादुरुस्ती हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. नेहरूंची बदनामी करण्यासाठी वस्तुस्थितीचा विपर्यास करून पंतप्रधानांच्या भाषणात याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यासाठी त्यांनी देशाची माफी मागावी. ही माझी मागणी आहे. जर तुम्ही देशासमोर वस्तुस्थितीचा विपर्यास करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही या सभागृहासमोर देशातील जनतेची माफी मागितली पाहिजे.”