
सुप्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांचे साहित्य महाराष्ट्रासह संपूर्ण देश आणि जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांच्या लेखनाचा गौरव पेंद्र सरकारने ‘पद्मश्री’ने केला आहे. असे असताना ‘चल हल्ला बोल’ चित्रपटाला ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देताना अधिकाऱ्यांनी ‘नामदेव ढसाळ कोण?’ असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे दलित चळवळीतील कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील जनतेमधून सेन्सॉर बोर्डविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे ‘नामदेव ढसाळ कोण?’, असे विचारणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीने बडतर्फ करा, अशी मागणी ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमरशेख यांनी केली आहे.
’चल हल्ला बोल’ हा चित्रपट दलित पँथर आणि युवा क्रांती दल यांच्यातील चळवळीवर बेतलेला चित्रपट आहे. परंतु सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात शिवराळ भाषा, अश्लील कविता असल्याचे सांगत आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नामदेव ढसाळ यांची पत्नी मल्लिका अमर शेख यांनी पत्रकार परिषद घेत सेन्सॉर बोर्डाला खडे बोल सुनावले आहेत. सेन्सॉर बोर्डच्या भूमिकेचा आपण तीव्र निषेध करीत असल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणीही मल्लिका ढसाळ यांनी केली आहे. मुळात अशी माणसं तुम्ही इतक्या महत्त्वाच्या पदांवर नेमताच कशी? अशा कडक शब्दात मल्लिका अमर शेख यांनी सेन्सॉर बोर्डाचा समाचार घेतला आहे.
असे आहेत आक्षेप
‘चल हल्ला बोल’ चित्रपटामध्ये नामदेव ढसाळांच्या कविता वापरण्याची परवानगी माझ्याकडे कुणीही मागितली नाही. त्यामुळे मी चित्रपट करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहे.
मुख्य म्हणजे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीवर सर्वस्वी माझा अधिकार आहे. यापुढे मला या चित्रपटासंदर्भात जे काही बोलायचे आहे ते मी कायदेशीर भाषेत बोलणार. कुठल्याही इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीवर समाजाचा अधिकार हा पन्नास वर्षांनी होतो.
त्यामुळेच माझ्या परवानगीशिवाय नामदेव ढसाळ यांचं साहित्य वापरण्यास कुणालाही परवानगी नाही. नामदेव ढसाळांच्या नावाचा, प्रतिमेचा गैरवापर मी होऊ देणार नाही.