मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांवर जादूटोणा! महिला राज्यमंत्र्यासह तिघांना अटक

मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी हिंदुस्थानविरोधी धोरण अवलंबले आहे. त्यामुळे मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. दरम्यान मालदीवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहम्मद मुइज्जू यांच्यावर काळी जादू केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एका राज्यमंत्र्याला मालदीव पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे मालदीवमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे.

मालदीवच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार फातिमा शमनाज अली सलीम असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. त्या मालदीवच्या पर्यावरण राज्यमंत्री आहेत. मोहम्मद मुइज्जूंच्या जवळ जाण्यासाठी जादूटोणा केल्याच्या आरोपाखाली फातिमा शमानाजसह अन्य दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एक आरोपी हा शमनाजचा भाऊ असल्याचे स्थानिक वृत्तपत्रात म्हटले आहे.

आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाकडून सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे मालदीव पोलिसांनी सांगितले आहे. शमानाज या राष्ट्रपती कार्यालयाचे मंत्री ॲडम रमीझ यांच्या पहिल्या पत्नी आहेत. शमानाझ यांना अटक करण्यापूर्वी त्यांच्या घराची झडती घेण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी घरातून काही वस्तूही जप्त केल्या आहेत. तसेच पुढील तपासदेखील सुरू ठेवला आहे.

कोण आहे फातिमा शमनाज अली सलीम ?

पर्यावरण मंत्री होण्यापूर्वी शमनाज हेनविरू साउथच्या माले सिटी काउंन्सिलच्या काउंन्सिलर होत्या. मुइज्जू सरकारमध्ये मंत्रीपद स्वीकारण्यासाठी त्यांनी या वर्षी एप्रिलमध्ये काउंन्सिलचा राजीनामा दिला होता. याआधी फातिमा राष्ट्रपती भवनात महत्त्वाच्या पदावर होत्या. फातिमा शमनाज या मंत्री ॲडम रमीझ यांच्या पहिल्या पत्नी आहेत. दरम्यान, त्यांचा घटस्फोट झाला असून त्यांना तीन मुले आहेत.