ठाणेकरांना साथीच्या आजारांचा विळखा; पालिकेची आरोग्य यंत्रणा सपशेल फेल

महापालिका हद्दीत साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. ठाणे शहराला मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड, स्वाईन फ्लू आणि अतिसार यांसारख्या साथीच्या रोगाचा विळखा पडल्याने पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे. सध्याच्या घडीला साथीच्या आजारांचे एकूण 241 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू असून सर्वात जास्त म्हणजेच 113 मलेरियाचे रुग्ण ठाण्यात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. साथीच्या आजारांना आळा घालण्यात आरोग्य यंत्रणा सपशेल फेल ठरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

परतीच्या पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असताना सतत पडत असलेल्या पावसामुळे जागोजागी पाणी साचत आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे मलेरिया, डेंग्यू, टायफॉईडच्या तापाने ठाणेकर फणफणले असून हॉस्पिटल आणि रक्त चाचणी केंद्रे फुल्ल झाली आहेत. सद्यस्थितीत जोरदार पाऊस असल्याने पुढचे 15 दिवस हे महत्त्वाचे असून संपूर्ण सप्टेंबर महिन्यापर्यंत आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील यादृष्टीने सर्व आरोग्य अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याचे निर्देश पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

25 दिवसांत 241 जणांना लागण
ठाण्यात मलेरियाचे 113 रुग्ण आढळून आले तर डेंग्यूचे 40, स्वाईन फ्लूचे 14, टायफॉईड 3, अतिसार आजारांचे 71 असे एकूण 241 जणांना अवघ्या 25 दिवसांत साथीच्या आजाराने ग्रासले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकमान्यनगरला वेढा
शहरातील झोपडपट्टी भागात सर्वात जास्त साथीच्या आजाराचे रुग्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान लोकमान्य, सावरकर, इंदिरानगर आणि यशोधननगर या परिसरात सर्वांत जास्त रुग्ण मलेरियाच्या आजाराने ग्रासले आहेत. या भागात पालिकेच्या आरोग्य विभागाने लक्ष घालावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

फायलेरिया विभाग सुशेगाद
महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी पाणी साचले जात आहे. अनेक ठिकाणी कचरा उचलला जात नाही तर अनेक ठिकाणी बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी डासांची पैदास वाढली आहे. त्या ठिकाणी फवारणी, प्रतिबंधात्मक औषधे, फॉगिंग करणे गरजेचे असतानादेखील पालिकेचा फायलेरिया विभाग सुशेगाद असून कुठेही फवारनी केली जात नसल्याने ठाणेकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे.