
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 2012 मध्ये सैफ अली खान आणि त्याच्या इतरा मित्रांविरुद्ध मारहाणीच्या खटला दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात न्यायालयात सुनावणी सुरू होती. या सुनावणीसाठी साक्षीदार म्हणून सतत गैरहजर राहिल्याबद्दल मुंबईतील एका दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्री मलायका अरोराविरुद्ध दुसऱ्यांदा जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे .
India Today या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायाधीश के.एस. झंवर यांनी अरोरा यांच्याविरुद्ध 5 हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट पुन्हा जारी करण्याचे निर्देश दिले. अभिनेत्रीला याआधी न्यायालयात हजर राहायचे आदेश दिले होते. मात्र ती गैरहजर राहिली. त्यामुळे न्यायालयाने 15 मार्च रोजी अरोरा यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले. त्यावेळी न्यायालयाने मलायकाची बहीण आणि अभिनेत्री अमृता अरोरा तसेच आणखी एक मित्र फारुख वाडिया यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केले.
मार्चमध्ये वॉरंट जारी झाल्यानंतर, वाडिया आणि अमृता अरोरा न्यायालयात हजर राहिले. आणि दोघांनीही न्यायालयात साक्ष दिली. दरम्यान न्यालायाने आता या महिन्याच्या अखेरीस जामीन वॉरंटबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
नेमक प्रकरण काय?
हे प्रकरण 22 फेब्रुवारी 2012 चे आहे. अभिनेता सैफ अली खान, करीना कपूर, करिश्मा कपूर, मलायका अरोरा, अमृता अरोरा आणि काही मैत्रिणी दक्षिण मुंबईतील एका उच्चभ्रू रेस्टॉरंटमध्ये जेवत होते. यावेळी एनआरआय व्यापारी इक्बाल शर्मा आणि त्याचे कुटुंब त्यांच्या शेजारच्या टेबलवर बसले होते. यादरम्यान शर्मा यांनी सैफ अली खानच्या गटाकडून मोठ्याने गप्पा मारत असल्याचे सांगत आक्षेप घेतला होता.
शर्मा आणि खान यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी सैफने शर्मा यांच्या नाकावर ठोसा मारला. यानंतर त्यांनी माझे सासरे रामन पटेल यांच्यासोबतही गैरव्यवहार केल्याचा आरोप शर्मा यांनी केला. यावेळी खान यांनी देखील शर्मा यांच्यावर त्यांच्या ग्रुपमधील महिलांना शिवीगाळ करून गैरवर्तन केल्याच आरोप केला. त्यामुळे खान आणि त्यांच्या सोबतच्या मित्रांना पोलिसांनी अटक केली. मात्र नंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. मात्र यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम (325) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.