लग्न जुळणाऱ्या साईटवरून बनावट प्रोफाईल तयार करून महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्याची फसवणूक करणाऱ्या लखोबाला बांगूरनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सागर गुप्ते ऊर्फ सागर कृष्णकुमार घोसाळकर असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
तक्रारदार महिला या गोरेगाव परिसरात राहतात. दोन वर्षांपूर्वी त्याने लग्नासाठी एका साईटवर प्रोफाईल अपलोड केले होते. ते प्रोफाईल अपलोड केल्यावर सागरने महिलेला मेसेज केला. तिच्याशी सुरुवातीला मैत्री करून त्यानंतर लग्नाच्या भूलथापा मारल्या. हिमाचल प्रदेश येथे परिवारासोबत फिरण्यासाठी जायचे असे सांगून त्याने महिलेकडून 56 हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याने ते पैसे महिलेला परत केले नाही. फसवणूकप्रकरणी महिलेने बांगूरनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. परिमंडळ-11 चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, वरिष्ठ निरीक्षक अनिल ठाकरे याच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विवेक तांबे, उपनिरीक्षक रोहन पाटील, गोवळकर, तावडे आदी पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना सागरची माहिती मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांनी गोरेगाव येथे सापळा रचून सागरला ताब्यात घेतले.
घटस्फोटित आणि विधवा महिलांना करायचा टार्गेट
सागर हा विविध लग्न जुळणाऱ्या वेबसाईटवर प्रोफाईल अपलोड करायचा. तो घटस्फोटित आणि विधवा महिलांना लग्नासाठी रिक्वेस्ट पाठवायचा. त्याच्याशी मैत्री करून पैसे उकळत असायचा. महिलांनी भेटण्यासाठी बोलावले असता तो बहाणा करायचा. फसवणुकीच्या पैशातून तो मौजमजा करत असायचा. त्याने आतापर्यंत किती महिलांना अशा प्रकारे फसवणूक केली आहे याचा तपास बांगूरनगर पोलीस करत आहेत.