थर्टी फर्स्टआधी हॉटेलांची अग्निसुरक्षा करून घ्या अन्यथा कडक कारवाई, पालिका घेणार झाडाझडती

मुंबईतील हॉटेलमध्ये थर्टी फर्स्टआधी फायर फायटिंग सिस्टीम नसेल तर पालिका नोटीस बजावून कठोर कारवाई करणार आहे. यासाठी 31 डिसेंबरआधी मुंबईतील सर्व हॉटेलची पालिकेच्या अग्निशमन दलाकडून झाडाझडती घेतली जाणार आहे. यामध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्यास नोटीस बजावून यंत्रणा तातडीने बसवण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.

मुंबईत सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात हॉटेलमध्ये पाटर्य़ा आयोजित केल्या जातात. यात तरुणाईचा समावेश मोठय़ा प्रमाणावर असतो. या ठिकाणी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी सुविधाही केलेली असते. मात्र आवश्यक काळजी घेतली नसल्यास या ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडून जीवित-वित्तहानी होण्याचा धोका असतो. त्यामुळे पालिकेकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. यात आता 31 डिसेंबरआधी मुंबईतील सर्व हॉटेलमधील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित असल्याबाबत खातरजमा करून यंत्रणा नसलेल्या हॉटेल्सना नोटीस बजावण्यात येणार आहे.

अशी होते कार्यवाही

मुंबईत तब्बल 40 लाखांवर मालमत्ता आहेत. उत्तुंग इमारतींना परवानगी देताना इमारतीत अग्निशमन यंत्रणा तैनात असेल तरच ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येते. यानंतर इमारतीचे फायर ऑडिट करून अग्निशमन यंत्रणा सक्षम असल्याबाबतचे प्रमाणपत्र फॉर्म ‘बी’ भरून दर सहा महिन्यांनी सादर करावे लागते.

मालक किंवा भोगवटाधारकांनी पात्र आणि सक्षम संस्थेकडून ऑडिट करून यंत्रणा सक्षम असल्याबाबत अग्निशमन दलाकडे ‘फॉर्म बी’ सादर करणे बंधनकारक आहे. अन्यथा ‘महाराष्ट्र फायर प्रिव्हेंशन अँड लाईफ सेफ्टी अॅक्ट मेजर्स अॅक्ट 2006’नुसार कारवाई करण्यात येते. कायदेशीर कारवाईनंतर वीज-पाणी कापण्याची कारवाई होऊ शकते.

ताबडतोब अग्निशमन यंत्रणा उभारा

मुंबईतील इमारती, आस्थापना, रुग्णालयांसह कार्यालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित आहे का याबाबत अग्निशमन दलाकडून नियमितपणे तपासणी करण्यात येते. यानुसार 120 ते 45 दिवसांची नोटीस बजावून अग्निशमन यंत्रणा उभारण्याचे निर्देश देण्यात येतात.

सद्यस्थितीत थर्टी फर्स्टसाठी शिल्लक राहिलेले दिवस पाहता अग्निशमन दल अॅक्शन मोडवर आले आहे. ज्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा नसेल अशा ठिकाणी ताततडीने ही यंत्रणा उभारण्याचे आदेश देण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.