महागाईची संक्रांत, भाज्या कडाडल्या; भेंडी, पापडी, वाल, वांगी, गाजर 15 ते 20 टक्क्यांनी महागले

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांवर महागाईची संक्रांत आली आहे. सणासुदीला भाज्या चांगल्याच कडाडल्या असून संक्रांतीच्या तोंडावर भेंडी, पापडी, वाल, वांगी आणि गाजर 15 ते 20 टक्क्यांनी महागल्या आहेत. 120 रुपये किलोने मिळणारा वाल तब्बल 200 रुपयांवर गेला आहे तर 60 रुपयांना मिळणारी वांगी 100 रुपयांवर गेली आहेत. त्यामुळे भोगीच्या भाजीचा तडका सर्वसामान्यांना ठसका आणणार आहे.

महागाईने किचनचे बजेट कोलमडून गेले आहे. सर्व प्रकारच्या भाज्या महागल्या आहेत. पालेभाज्यांच्या दरातही 10 ते 15 टक्क्यांची वाढ झाल्याचे ठाण्याच्या गावदेवी भाजी मंडईतील भाजी विव्रेते सुधीर कदम यांनी सांगितले. संक्रांतीमुळे पालेभाज्यांच्या दरात गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत वाढ झाल्याचे चित्र आहे. कोथिंबीर, शेपू, मेथी, कांदापात, पुदिना, राजगिरा, पालक, हरभऱयाच्या गड्डीच्या दरात वाढ झाली. कोथिंबीर 70 हजार जुडी, मेथीच्या 70 हजार जुडी तसेच हरभरा गड्डीची 50 हजार जुडीची आवक झाली.

महागाई तर आमच्या पाचवीलाच पुजली आहे. पेट्रोल-डिझेल महाग, गॅसचे दर वाढवले. आता रोजच्या जेवणात लागणाऱया भाज्याही कडाडल्या आहेत. सणासुदीलाही आमच्यासारख्या सर्वसामान्यांचा खिसा रिकामाच होतो. सरकारने आमचे जगणेच महाग करून ठेवले आहे. त्यामुळे किचनचे बजेट कोलमडत असून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आमच्यावर महागाईची संक्रांत आलेली आहे, असा संताप दादरमधील मनीषा काळे या गृहिणीने व्यक्त केला.

अर्थव्यवस्थेचा वेग मंदावणार

जागतिक स्तरावर आर्थिक वाढ स्थिर असल्याचे दाखवले जात असूनही 2025 मध्ये हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग मंदावणार असल्याचा अंदाज आहे, असे मत आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांनी व्यक्त केले आहे. विविध देशांमध्ये अर्थिक वाढीचा वेग कमी जास्त असू शकतो. भारतीय अर्थव्यवस्था थोडी कमकुवत होईल, असा अंदाज जॉर्जिएवा यांनी व्यक्त केला आहे. अमेरिका अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत आहे. युरोपियन महासंघ काहीसा स्थिर आहे. तर हिंदुस्थानची कामगिरी थोडी कमकुवत आहे. ब्राझीलला महागाईचा अधिक सामना करावा लागणार आहे.

आवकच्या चारपट मागणी

भाज्यांची जितकी आवक एपीएमसी बाजारात होत आहे तिच्या चारपट मागणी आहे. त्यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत, अशी माहिती एपीएमसी बाजारातील भाजी व्यापारी शंकर रामचंद्र फडतरे यांनी दिली.
नारळाने गाठली चाळिशी

नारळानेही चाळिशी गाठली आहे. गेल्या वर्षी साधारण दहा रुपयाला मिळणारा नारळ आता 25 ते 30 रुपयांपर्यंत बाजारपेठेत विकला जात आहे. तर त्याहून मोठा नारळ 35 ते 40 रुपयांवर पोहोचला आहे. नारळ उत्पादनात कमालीची झालेली घट आणि नारळाला असलेली मागणी पाहता नारळाचे दर वाढल्याचे बागायतदारांनी म्हटले आहे. बदलत्या हवामानासह लाल तोंडाचे माकड, वानर, शेकरू, उंदीर यांनीही बागायतींचे मोठे नुकसान केल्याने नारळ उत्पादन घटल्याचे चित्र आहे.

आधीचे आणि आताचे दर

(किलोमागे)

  • भेंडी 100 120
  • पापडी 80 120
  • वाल 120 200
  • पावटा 100 120
  • वांगी 60 100
  • गाजर 60 80