मुंबई महानगरपालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात विद्युत विभागात 122 कर्मचाऱयांची मंजूर पदे असताना केवळ 22 कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱयांवर कामाचा प्रचंड ताण येत असून ऐनवेळी आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास होणाऱया परिणामांना जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात असून रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी केली जात आहे.
पालिकेच्या केईएम रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. यामध्ये यांत्रिकी व विद्युत विभागातील अभियांत्रिकी सेवांसाठी सुविधा व्यवस्थापनाकडून विविध पदांसाठी पुरवण्यात आलेल्या मनुष्यबळाची सेवा 1/12/2024 पासून खंडित करण्यात आल्याचे आदेश कर्मचाऱयांना देण्यात आले आहेत. सध्या विद्युत विभागात सुमारे 120 पदांपैकी केवळ 22 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे प्रत्येक पाळीमध्ये व जनरल पाळीमध्ये बहुमजली इमारत, मुख्य इमारत, वैद्यकीय इमारत आणि ओसी इमारत या विद्युत विभागात केवळ फक्त 2 कर्मचारी उपस्थित असतात. रुग्णालयांतील 30 लिफ्ट असून त्या जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत. यांच्या देखभालीसाठी केवळ 2 कर्मचारी असल्याने या ऐनवेळी बंद पडल्यास रुग्ण, डॉक्टर्स, नातेवाईक, वैद्यकीय कर्मचाऱयांची मोठी गैरसोय होत आहे. वॉर्डमध्ये काही ठिकाणी अंधार आहे. पंप, जनरेटर व वॉर्डमधीर दुरुस्तीच्या कामासाठी कर्मचारी नाहीत. काही ठिकाणी अंधार आहे. लिफ्टमन नसल्याने वादविवाद, मारहाण असे प्रकार घडत असल्याचे कर्मचाऱयांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेने विद्युत विभागातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी कामगारांनी रुग्णालय प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. मात्र हे निवेदन देऊन महिना उलटून गेला तरी अद्याप कारवाई झाल्याने आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.