
पनामात विजेचं मोठं संकट निर्माण झालं आहे. येथे वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण देशात अंधार पसरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशाला वीज पुरवणाऱ्या ला चोरेरा थर्मोइलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये स्फोट होऊन आग लागल्यानंतर पनामा पूर्णपणे ब्लॅकआऊट झालं आहे.
याबाबत माहिती देताना येथील स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, प्लांटच्या एका जनरेटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही समस्या उद्भवली, ज्यामुळे देशभरात वीजपुरवठा खंडित झाला आहे. विजेअभावी नागरिकांना पाण्याची समस्याही भेडसावत आहे. अग्निशमन दल सध्या पॉवर प्लांटमधील आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या काही तासांत वीज हळूहळू पूर्ववत होईल, असं येथील स्थानिक अधिकारी म्हणत आहेत.