साहित्य क्षेत्रात देशात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱया साहित्य अकादमीच्या पुरस्कार प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. या वर्षापासून साहित्य अकादमीच्या मुख्य पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशकांकडून पुस्तके मागवली जाणार आहेत. पुस्तके पाठवण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे. साहित्य अकादमीने मान्यता दिलेल्या 24 हिंदुस्थानी भाषांमध्ये दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. साहित्य अकादमीच्या पुरस्कार प्रक्रिया बदलाची माहिती अकादमीचे सचिव के. श्रीनिवास राव यांनी दिली. ते म्हणाले की, लेखक, प्रकाशकांना आता साहित्य अकादमीच्या पुरस्कारासाठी स्वतः अर्ज भरून एक पुस्तक पाठवावे लागेल. त्यासाठी साहित्य अकादमीने अर्जाचा नमुनासुद्धा उपलब्ध करून दिला आहे. पुस्तके सादर करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे. 2025 च्या पुरस्कारांसाठी, 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांची एक प्रत अर्ज भरून विचारार्थ पाठवता येईल.