शेतकऱयांचे उसाचे कोटय़वधी रुपये थकविले; नगरमधील कुकडी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करणार

File Photo

नगर जिह्यातील श्रीगोंदा येथील कर्मयोगी पुंडलिकराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. शेतकऱयांच्या उसाचे कोटय़वधी रुपये कारखान्याने थकविले. त्यामुळे 21 कोटी 3 लाख 50 हजार रुपयांच्या वसुलीसाठी कुकडी साखर कारखान्याची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून त्याची विक्री करावी आणि शेतकऱयांचे पेमेंट द्यावे, असे आदेश साखर आयुक्त कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. त्यासाठी नगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील दिवंगत नेते, कर्मयोगी पुंडलिकराव जगताप पाटील यांनी कुकडी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. त्यांच्या निधनानंतर माजी आमदार राहुल जगताप यांच्याकडे कारखान्याची सूत्रे आहेत.

21 कोटींची थकबाकी

शेतकऱयांनी कारखान्याला ऊस दिला. उसाचे गाळप होऊनही कारखान्याने शेतकऱयांचे पेमेंट दिले नाही. शेतकऱयांचे 21 कोटी 3 लाख 50 हजार रुपये थकविले. थकबाकी वसुली संबंधीचा आरआरसीचा प्रस्ताव प्रादेशिक साखर सहसंचालकांनी पुण्याच्या साखर आयुक्तांकडे पाठवला होता. त्यावर साखर आयुक्तांकडे सुनावणी होऊन कारखाना प्रशासनास म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतर कारखान्याने काही रक्कम दिली. मात्र, सध्या कुकडी साखर कारखान्याकडे 15 कोटी 63 लाख 46 हजार रुपयांची थकबाकी आहे. या रकमेवर पंधरा टक्के व्याज आकारण्यात येणार आहे.

साखर आयुक्तांचे काय आहेत आदेश

z शेतकऱयांची थकबाकी देण्यासाठी कुकडी साखर कारखान्याची स्थावर व जंगम मालमत्ता ताब्यात घेऊन त्यावर शासनाचे नाव लावावे, असे आदेश साखर आयुक्त कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. z कारखान्याकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून साखर, मोलॅसिस व इतर उत्पादने जप्त करावी. त्याची विक्री करून त्यामधून रक्कम वसूल करावी आणि शेतकऱयांचे पैसे द्यावेत, असेही आदेशात म्हटले आहे. z साखर आयुक्त खेमनार यांनी नगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.