
तेलंगणातील नागरकुरनूल जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. बोगद्याचा एक भाग कोसळल्याने त्यात 6 ते 8 कामगार अडकल्याची शक्यता असून ते ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त होत आहे. कामगारांना वाचवण्यासाठी ताताडीने बचाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. अडकलेल्या कामगारांची संख्या 6 ते 8 असण्याची शक्यता असून नमके किती कामगार अडकले आहेत, याची माहिती घेण्यात येत आहे.
तेलंगणातील नागरकुरनूल जिल्ह्यातील श्रीशैलम लेफ्ट बँक कालव्याच्या बांधकामाधीन भागात शनिवारी ही दुर्घटना घडली. बोगद्यातील कालव्याच्या छताचा एक भाग कोसळला. बांधकाम कंपनीची टीम आढावा घेण्यासाठी बोगद्याच्या आत गेली आहे. तिथे अपघात आणि घडलेल्या दुर्घटनेची पडताळणी करण्यात येत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार बोगद्यात 6 ते 8 कामगार अडकले आहेत, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयाने एक निवेदन जारी केले आहे. या घटनेत अनेक लोक जखमी झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना मदत कार्यासाठी घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, राज्याचे पाटबंधारे मंत्री एन. उत्तम कुमार रेड्डी, पाटबंधारेविषयक सरकारी सल्लागार आदित्यनाथ दास आणि इतर पाटबंधारे अधिकारी एका विशेष हेलिकॉप्टरने घटनास्थळी रवाना झाले आहेत.
या अपघातावर चिंता व्यक्त करताना केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांनी अपघाताच्या कारणांची माहिती मागितली आणि अधिकाऱ्यांना अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सांगितले. त्यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की त्यांनी अधिकाऱ्यांना जखमींवर उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.