बाबा सिद्दिकी हत्याकांड – मुख्य मारेकऱ्याला उत्तर प्रदेशमधून बेड्या; अनमोल बिष्णोईच्या संपर्कात होता

बाबा सिद्दिकी हत्याकांड प्रकरणामध्ये पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. बाबा सिद्दिकी हत्याकांडातील मुख्य आरोपी शिवकुमार याला उत्तर प्रदेशमधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच आणि उत्तर प्रदेश एसटीएफने ही संयुक्त कारवाई केली आहे. शिवकुमार याला रविवारी उत्तर प्रदेशमधील नानपारा येथून अटक करण्यात आली. एसटीएफचे प्रमुख परमेश कुमार शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश एसटीएफने दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी हत्याकांडातील मुख्य मारेकरी शिवकुमार नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. त्याआधी सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. शिवकुमार व्यतिरिक्त अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेशेंद्र प्रताप सिंह यांनाही अटक करण्यात आली आहे. शिवकुमारला आश्रय देणे आणि त्याला नेपाळला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

शिवकुमार हा मुख्य शूटर असून त्याने पोलीस चौकशीत धक्कादायक खुलासे केले आहेत. या हत्याकांडात सहभागी आरोपींनी कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईच्या आदेशावरून बाबा सिद्दिकी यांची हत्या केल्याची कबुली दिल्याचे यूपी एसटीएफने सांगितले. शूटर्सनी शुभमन लोणकर आणि मोहम्मद यासीन अख्तर यांच्याकडून हत्येसाठीचे साहित्य मिळाल्याचीही कबुली दिली. तसेच आरोपी लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिष्णोई याच्याही संपर्कात असल्याचे समोर आले आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर मला 10 लाख रुपये मिळतील. यासह दर महिन्याला विशेष रक्कम मिळेल, अशी कबुली शिवकुमारने दिली. तसेच शुभम लोणकर आणि यासीन अख्तरने हत्येसाठी शस्त्र, काडतूसे, सीम आणि मोबाईल दिला, असा जबाब शिवकुमारने यूपी एसटीएफकडे दिला आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर तिन्ही शूटर्सला संपर्कात राहण्यासाठी नवीन सीम आणि मोबाईल देण्यात आले होते. बऱ्याच काळापासून आम्ही मुंबईत बाबा सिद्दिकी यांची रेकी करत होतो. योग्य वेळ मिळताच त्यांना ठार मारले, असेही शिवकुमारने जबाबात म्हटले.