घरफोडीप्रकरणी मोलकरणीला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. चंदा मिरधा असे तिचे नाव आहे. तिच्याकडून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. तिला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
तक्रारदार महिला या अंधेरी येथे राहतात. काही महिन्यांपूर्वी चंदाची तक्रारदार महिलेशी ओळख झाली होती. चंदाने तिच्या परिचित असणाऱ्या महिलेला कामाला ठेवले होते. मात्र तक्रारदार महिलेला आणखी मोलकरणीची गरज असल्याने त्याने चंदालाच कामाला ठेवले. गेल्या आठवड्यात तक्रारदार महिला कामानिमित्त बँकेत गेल्या होत्या तेव्हा चंदा ही एकटीच घरात होती. तक्रारदार या काम आटोपून दुपारी घरी आल्या. त्यानंतर चंदा ही सायंकाळी निघून गेली.
रात्री तक्रारदार महिलेला लॉक केलेला कपाटाचा दरवाजा उघडा दिसला. कपाटातून सोन्याचे दागिने आणि सहा लाख रुपये चोरीला गेल्याचे तिच्या लक्षात आले. चोरीप्रकरणी महिलेने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद केल्यावर पोलिसांनी चंदाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर तिने चोरीची कबुली दिली.