दिल्लीतील मासळी बाजार बंद; विक्रेत्यांना धमकावल्याचा महुओ मोईत्रा यांचा आरोप

राजधानी दिल्लीतील बंगालीबहुल भाग असलेल्या चित्तरंजन पार्क येथील मसाळी बाजार बंद करण्यात आला आहे. येथील मासळी विक्रेत्यांना धमकावण्यात येत असल्याचा आरोप तृँमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केला आहे. या भागातील मासळी विक्रेत्यांना भाजप नेते धमकावत आहेत, तसेच त्यांनी या भागातील मासळी बाजार बंद केल्याचा आरोप मोईत्रा यांनी केला आहे. या मुद्द्यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे.

बंगाली बहुल भागातील चित्तरंजन पार्क येथील मंदिराजवळ व्यवसाय करणाऱ्या मासळी विक्रेत्यांना भाजप नेते धमकावत आहेत, असा आरोप मोईत्रा यांनी केल्यावर त्या जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा भाजपने केला आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यात यावे, तसेच अवैध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे, असे भाजपचे म्हणणे आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

मोईत्रा यांनी मंगळवारी दावा केला की, आग्नेय दिल्लीतील बंगाली बहुल चित्तरंजन पार्कमधील मासे आणि मांस दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये एक व्हिडिओ देखील जोडला आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, भाजपचे गुंड परिसरातील मंदिराशेजारी व्यवसाय करणाऱ्या मासे बाजार व्यापाऱ्यांना धमकावत आहेत.

त्यांच्या पोस्टसह असलेल्या व्हिडीओमध्ये भगव्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स घातलेला एक माणूस चित्तरंजन पार्कच्या मार्केट क्रमांक 1 मध्ये मंदिराशेजारी मासळी बाजार उभारणे चुकीचे असल्याचे सांगत असल्याचे ऐकू येते. बाजार मंदिराच्या शेजारी आहे. हे चुकीचे आहे. ते सनातनांच्या भावना दुखावत आहे. सनातन धर्म म्हणतो की आपण कोणालाही मारू नये. मासे आणि मांस देवतांना अर्पण केले जाते, ही कल्पना आहे, शास्त्रांमध्ये याचा कोणताही पुरावा नाही, असे तो व्यक्ती सांगत मासळी विक्रेत्यांना धमकावत असल्याचे सांगण्यात आले.

सीआर पार्कमधील ज्या मंदिरावर भाजपचे गुंड दावा करतात ते मांसाहारी विक्रेत्यांनी बांधले होते. ते तिथे प्रार्थना करतात, तिथे मोठ्या पूजा होतात, असे मोईत्रा यांनी सांगितले. येथील विक्रेत्यांनी धमकावण्यात येत असल्याच्या दाव्याला पुष्टी देण्यासाठी त्यांनी एका रहिवाशाने बंगालीमध्ये लिहिलेल्या व्हॉट्सअॅप संदेशाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यात म्हटले आहे की, सीआर पार्कमधील मांस आणि माशांची दुकाने जबरदस्तीने बंद करणे हे गंभीर आहे. मी सीआर पार्कजवळ राहतो. येथे, सर्व मांस बाजार आणि माशांची दुकाने गेल्या 10 दिवसांपासून बंद आहेत. ही परिस्थिती गंभीर आहे, असे त्यात म्हटले आहे. सीआर पार्कमधील बंगालीबहुल भाग हे दिल्लीतील सर्वात सुशिक्षित समुदायांपैकी एक आहेत. त्यांच्या भावना आणि खाण्याच्या सवयींचा आदर केला पाहिजे. त्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल कधीही समस्या आली नाही. भाजप इतक्या शांत भागात समस्या का निर्माण करत आहे? असा सवालही या भागातील नागिरक करत आहे. मोईत्रा यांनी हा मुद्दा उचलून धरल्याने नवा राजकीय वाद सुरू होण्याची शक्यता आहे.