गोळीबार करणाऱ्या सरवणकरांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी, महेश सावंत यांची मागणी

माजी आमदार सदा सरवणकर यांनी दोन वर्षांपूर्वी माझ्यावर बंदूक रोखली होती, गोळीबार केला होता. पण आजपर्यंत त्यांच्या विरोधात कोणताही कारवाई झालेली नाही. आमदारांना स्वसंरक्षणार्थ रिव्हॉल्व्हर दिले जाते, पण त्याचा दुरुपयोग त्यांनी माझ्यावर केलेला आहे. त्यांच्या विरोधात लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना आमदार महेश सावंत यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे केली.

मेट्रोच्या बॅरिकेड्समुळे वाहतूककोंंडी 

माहीम मतदारसंघात मेट्रो रेल्वेची छत्रपती शिवाजी पार्क, शितलादेवी आणि सिद्धिविनायक मंदिर ही तीन स्टेशन आहेत. यातील बहुतेक ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत आहे. रस्त्याच्या कडेलाही बॅरिकेड्स लावण्यात आल्यामुळे दुकानांमध्ये जाण्यासाठी रस्ता मिळत नाही. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होऊन आर्थिक कोंडी झाली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

शिवाजी पार्कवर हिरवळ लावा

छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सध्या धुळीचे साम्राज्य झाले आहे त्यामुळे आझाद मैदानाप्रमाणे संपूर्ण शिवाजी पार्कवर हिरवळ लावावी. त्यामुळे धुळीचा त्रास होणार नाही. इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. पालिकेच्या जी उत्तर विभागात उत्तुंग इमारती झाल्याने पिण्याचे पाणी कमी दाबाने येते, अशी तक्रार महेश सावंत यांनी केली.