
गेल्या दहा वर्षांपासून भोसरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेले भाजप आमदार महेश लांडगे यांना चिखलीतील कुदळवाडीमध्ये चक्क बांगलादेशी आणि रोहिंगे घुसखोर असल्याचा साक्षात्कार झाला आहे. तोही विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर. लांडगे यांनी हा संशय व्यक्त करतानाच, या घुसखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणीही केली. मात्र, आमदार लांडगे यांच्या संशयाला चिखली पोलिसांनी दुजोरा दिला नाही.
चिखली-कुदळवाडीमध्ये सातत्याने पोलिसांची कारवाई होत असून, अद्यापपर्यंत या भागात कोणत्याही प्रकारचे बांगलादेशी किंवा रोहिंगे घुसखोर मिळून आले नसल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. त्यामुळे आमदारांवर विश्वास ठेवायचा की पोलिसांवर, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चिखली-कुदळवाडी येथे सकाळी भंगार गोदामांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या दुर्घटनेमध्ये 50हून अनेक दुकाने खाक झाली. महेश लांडगे यांनी या मुद्द्याकडे अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
शहरात गेल्या वर्षभरामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे शहरात वास्तव्य करणाऱ्या 70हून अधिक बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली. काही घुसखोर देशविघातक कृत्यांशी संबंधित आहेत, हेसुद्धा तपासात समोर आले आहे. बहुतांशी बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे अशा भंगार दुकानांवर काम करतात. पिंपरी-चिंचवड पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांनी सातत्याने कारवाई सुरू ठेवली आहे. असे असले, तरी पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
चिखली-कुदळवाडी परिसरात पोलिसांकडून सातत्याने कोम्बिंग ऑपरेशन केले जाते. संशयित नागरिकाच्या कागदपत्रांची तपासणी केली जाते. पोलिसांकडून या भागात नव्याने वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांवर बारीक नजर ठेवली जाते. अद्यापपर्यंत झालेल्या कारवाईत या भागात एकही बांगलादेशी अथवा रोहिंगा आढळून आलेला नाही.
विठ्ठल साळुंके (वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिखली)