
यशस्वी कर्णधार… भन्नाट यष्टिरक्षक… ग्रेट फिनिशर… असा लौकिक मिळविलेला महेंद्रसिंह धोनी आता क्रिकेटच्या मैदानावर आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करीत नाही. चेन्नई सुपर किंग्जच्या या धुरंधर खेळाडूने आता ‘आयपीएल टी-20’ क्रिकेट स्पर्धेतून निवृत्त व्हायला हवे, अशी प्रांजळ इच्छा त्याचेच चाहते व्यक्त करीत आहेत, मात्र आपण अद्यापि ‘आयपीएल’मधून निवृत्त होणार नसल्याचे स्पष्ट करीत धोनीने अफवा अन् चर्चांना पूर्णविराम दिलाय.
राज शमानी यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये धोनीने निवृत्तीच्या अफवांबद्दल खुलासा केला. ‘आयपीएलच्या यंदाच्या हंगामात निवृत्त होण्याचा आपला कुठलाही विचार नाही,’ असे सांगून धोनी म्हणाला, ‘मी अजूनही आयपीएलमध्ये खेळत आहे. मी गोष्टी अगदी सोप्या ठेवल्या आहेत. मी एका वेळी फक्त एका वर्षाचाच विचार करतो. मी सध्या 43 वर्षांचा असून यंदाच्या आयपीएल समाप्तीपर्यंत मी 44 वर्षांचा असेन. त्यानंतर आयपीएलच्या आगामी हंगामात खेळायचे की नाही, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे दहा महिने शिल्लक असतील, मात्र तूर्तास तरी मी निवृत्तीबाबत कोणताही निर्णय घेत नाहीये. मी कधी निवृत्त व्हायचे हे सर्वस्वी माझ्या शरीरावर अवलंबून आहे,’ असेही त्याने सांगितले.