महायुतीचा चिखल विधानसभा निवडणुकीत साफ होणारच! आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

लोकसभा निवडणुकीत 400 पारची आवई उठवणाऱ्या भाजपला मित्रपक्षांच्या कुबडय़ा घेऊन केंद्रात सरकार बनवावे लागले. संविधान बदलायला निघालेल्या महायुतीला जनतेनेच धडा शिकवला आहे. आता त्यांचा उरलासुरला चिखल जनता विधानसभा निवडणुकीत साफ करेल, असा विश्वास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. कर्जत-खालापूरच्या गद्दारांना विधानसभेला गाडल्याशिवाय येथील शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत, असा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेच्या संवाद दौऱ्याचा प्रारंभ आज कर्जत, उरणपासून झाला. दोन्ही शहरांमध्ये आदित्य ठाकरे यांचे शिवसैनिकांनी दणक्यात स्वागत केले. कर्जतच्या किरवली येथील साईपृपा शेळके हॉल येथे मेळावा झाल्यानंतर उरणच्या जेएनपीटी बहुउद्देशीय सभागृहातही जोरदार मेळावा झाला.

यावेळी भाषणात आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि मिंधे गटाचा खरपूस समाचार घेतला. आपल्या हक्काचे, सर्वांना आपले वाटणारे महाराष्ट्राचे सरकार हवे आहे. स्वाभिमानाने जगायचे असेल तर आपल्याला महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. हा निर्धार पुढे घेऊनच आपल्याला संवाद दौरा राज्यभर न्यायचा असे आदित्य ठाकरे यांनी सांगताच शिवसैनिकांनी वज्रमुठी आवळून शिवसेना झिंदाबादच्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.

राज्यात सत्तेवर आलेल्या घटनाबाह्य सरकारची इतक्या दिवसात महापालिकेची निवडणूक घेण्याचीही हिम्मत झाली नाही. पण कितीही चालढकल केली तरी त्यांचा पराभव अटळ आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. लोकसभा निवडणुकीत भाजप मित्रपक्षांना ते खिजगणितीतही धरत नव्हते. मात्र 400 पारचा फुगा फुटल्यानंतर ते एनडीए सरकार असे बोलू लागले आहेत. संविधान बदलायला निघालेल्यांना देशातील विशेषतः महाराष्ट्रात जनतेने धडा शिकवला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे आपण आहोत. म्हणूनच हा विजय देशाचा आहे. भाजपला आपण संविधान बदलण्यापासून रोखले आहे. केंद्रातील सरकारचा खेळ कधीही बदलू शकतो. देशात इंडिया आघाडीचे सरकार येऊ शकते, असे सूतोवाचही आदित्य ठाकरे यांनी केले.

यावेळी उपनेते सचिन आहिर, उपनेत्या ज्योती ठाकरे, मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील, महिला संपर्कप्रमुख किशोरी पेडणेकर, मनीषा ठापूर, रेखा ठाकरे, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, सुनील पाटील, जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, जेएनपीए कामगार ट्रस्टी दिनेश पाटील, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, विधानसभा संपर्प प्रमुख महादेव घरत, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, भाई शिंदे, रियाज बुबेरे, उपतालुकाप्रमुख दशरथ भगत, तालुका संघटक बाबू घारे, महिला आघाडी जिल्हा संघटक सुवर्णा जोशी, अनिता पाटील, शहरप्रमुख नीलेश घरत, संजय मोहिते, विनोद पांडे, प्रशांत दिघे, मुकेश पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

काल शंकराचार्यांचे दर्शन घेतले, आज जनता जनार्दनाचे दर्शन घ्यायला आलोय

लोकसभा निवडणुकीत कठीण परिस्थितीत आपण लढलात आणि जिंकलात. त्याचे आभार मानायला मी येथे आलो आहे. काल शंकराचार्यांचे दर्शन घेतले आणि आज माझ्या विठोबाचे म्हणजेच जनता जनार्दनाचे दर्शन घेण्यासाठी आपल्यासमोर आलो आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. धर्मात सगळ्यात मोठे पाप विश्वासघात असल्याचे शंकराचार्यांनी म्हटले आहे. गद्दारीचे पाप करणाऱ्यांना लोकसभेत  आपण धडा शिकवलाच आहे आणि आता विधानसभेतपण शिकवायचा आहे. गद्दारांना गाडायचेच, असा मंत्रच आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला.

चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार यांनी त्यांच्या राज्यासाठी घसघशीत पॅकेज मागितले आणि मिळवले,  एकदा तरी आपल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे महाराष्ट्रासाठी पॅकेज मागितलेले ऐकले का? यांचे बिल्डर, कॉन्ट्रक्टरांचे पॅकेज सुरू आहेत. 

गद्दारांनी केलेला विश्वासघात फक्त शिवसैनिकांसोबत नाही तर महाराष्ट्रा सोबत केलेला आहे. 

पाठून वार केला, समोरून वार केला असता तर घेतला असता शिंगावर हीच ताकद आहे शिवसेनेची …

अत्यंत कठीण काळात ज्यांनी उद्धवजींच्या पाठीत खंजीर खुपसला, महाराष्ट्र संपवण्याचे कट कारस्थान केलं त्यांना दया क्षमा शांती नाही म्हणजे नाहीच…