बंडखोरांचे फटाके वाजणार की विझणार! महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला बंडोबांचे टेन्शन अधिक

विधानसभा निवडणुकीत पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने राज्यात ठिकठिकाणी इच्छुकांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. राज्यातील बहुतांश मतदारसंघांत 150 हून अधिक नाराजांनी बंडखोरी केली आहे. उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर आता बंडोबांना थंड करण्याचे आव्हान सर्वच पक्षांपुढे आहे. दिवाळीच्या चार दिवसांत बंडखोरांचे फटाके फुटणार की विझणार हे 4 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडीपेक्षा महायुतीत सर्वाधिक बंडखोरी झाली असून बंडोबांना शांत कसे करायचे याचे टेंशन महायुतीच्या नेत्यांना आहे.

महायुतीत भाजपमध्ये बंडखोरीचे पीक आले असून शिंदे गट व अजित पवार गटाच्या विरोधात भाजप उमेदवार उभे ठाकले आहेत. काही ठिकाणी शिंदे आणि अजित पवार गटाचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यांची समजूत कशी काढायची हा प्रश्न महायुतीच्या प्रमुख नेत्यांपुढे आहे. राज्यात पुन्हा सत्ता आल्यास महामंडळावर वर्णी लावण्याबरोबर पक्षसंघटनेत मोठी जबाबदारी देण्याचे आश्वासन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून भाजप बंडखोरांना दिले जात आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटाकडूनही विधान परिषदेचे गाजर काही बंडखोरांना दाखविले जात आहे. बंडखोरांचे प्रमाण पाहता सर्वांचे समाधान करणे शक्य नसल्याने महायुतीच्या नेत्यांना बंडाचे फटाके विझण्यापेक्षा ते फुटण्याची भीती अधिक आहे.

हे आहेत महायुतीचे बंडोबा

भाजप

बोरिवली – गोपाळ शेट्टी, सांगली – पप्पू डोंगरे, जत – तमन्नागौडा रवी पाटील, शिराळा – सम्राट महाडिक, सोलापूर उत्तर – शोभा बनशेट्टी, संजय साळुंखे, अमर बिराजदार, सोलापूर मध्य- श्रीनिवास संगा, सोलापूर दक्षिण – मेनका राठोड, सावंतवाडी – विशाल परब, अलिबाग – दिलीप भोईर, खानापूर आटपाडी – ब्रम्हानंद पडळकर, पिंपरी – बाळासाहेब ओव्हाळ, भोर – किरण दगडेपाटील, शिरूर – प्रदीप पंद, बुलढाणा – विजयराज शिंदे, सिल्लोड – दादाराव आळणे, नेवासा – बाळासाहेब मुरकुटे

शिंदे गट

विक्रमगड – प्रकाश निकम, सोलापूर उत्तर – अमोल शिंदे, सोलापूर मध्य – मनीष काळजे, जुन्नर – शरद सोनावणे, फुलंब्री – रमेश पवार, किशोर बलांडे, कन्नड सोयगाव – भाऊसाहेब काजे, वसमत – राजू चापके, दिंडोरी – धनराज महाले, उमरेड – राजू पारवे

अजित पवार गट

चिंचवड – नाना काटे, भाऊसाहेब भोईर, दौंड – वीरधवल जगदाळे, मावळ – बापू भेगडे, माढा ः रणजितसिंह शिंदे, पैठण – कल्याण गायकवाड, विजय चव्हाण, कन्नड सोयगाव – नितीन पाटील, संतोष कोल्हे, स्वाती कोल्हे, नाशिक मध्य – रंजन ठाकरे, नांदगाव – समीर भुजबळ, इगतपुरी- जयप्रकाश झोले, बाळापूर ः श्रीकृष्ण अंधारे, नागपूर पूर्व – आभा पांडे, अर्जुनी मोरगाव – डॉ. सुगत चंद्रीकापुरे

महायुतीचे 35 उमेदवार अडचणीत

वर्षानुवर्षे सक्रीय असलेल्या इच्छुक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारल्याने महायुतीतील घटक पक्षांनी एकमेकांच्या विरोधात अर्ज दाखल केले आहेत. यामुळे महायुतीचे 35पेक्षा जात उमेदवार अडचणीत आले आहेत. बोरिवली, घाटकोपर पूर्व, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, एरंडोल, जळगाव शहर, अमळनेर, पाचरोरा, नगर, मध्य नागपूर, पश्चिम नागपूर आदी ठिकाणच्या जागा तिन्ही पक्षांमधील कुरघोडीच्या राजकारणामुळे अडचणीत आल्या आहेत.

शिंदे गटापुढे आव्हान

सावंतवाडीत मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजपच्या विशाल परब यांनी बंड पुकारले आहे. अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजपचे सुनील मिरकर उभे ठाकले. बुलढाण्यात संजय गायकवाड यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बंडखोरी करत आव्हान उभे केले आहे.

दादांच्या 7 जागा संकटात

अजितदादा गटाच्या वाटय़ाला सर्वात कमी जागा आल्या आहेत. त्यानंतरही दादा गटाविरोधात भाजप आणि शिंदे गटाच्या उमेदवारांनी बंडाचा झेंडा फडकवलाय. यामध्ये धर्मराव अत्राम, सना मलिक, नरहरी झिरवाळ, छगन भुजबळ अशा किमान 7 जागा संकटात आहेत.

राजकीय समीकरण बदलण्याची धास्ती

बंडामुळे मतविभाजनाचा मोठा धोका उमेदवारांना निर्माण झाला आहे. काही बंडखोर हे प्रभावहीन असले तरी त्यांच्यामुळे विजयी आघाडी कमी होऊन राजकीय समीकरणे बदलण्याची धास्ती पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना आहे. त्यामुळे बंड शमविण्याची धडपड पक्ष नेतृत्वासह उमेदवार करीत आहेत.