खातेवाटपानंतर आता मंत्र्यांची मंत्रालयातील दालनांचा ताबा घेण्यासाठी एकच धावपळ उडाली आहे. पूजापाठ वगैरे सुरू झाले आहे. वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी मंत्रीपद स्वीकारल्यानंतर दालनात विधिवत पूजा करून घेतली आणि पुढील पाच वर्षे मंत्रीपद टिकून राहू देत अशी प्रार्थना केल्याची चर्चा मंत्रालयात दिवसभर रंगली होती.
महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडल्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी खातेवाटप जाहीर करण्यात आले होते. सध्या सुट्टीचा माहौल असल्याने नवनिर्वाचित मंत्री आपल्या पदाचा कार्यभार कधी स्वीकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. पण आजच मंत्रालयात निवडक मंत्र्यांनीच आपल्या खात्यांचा पदभार स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. त्यात पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, संजय सावकारे आणि प्रताप सरनाईक यांचा समावेश आहे.
वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी आज त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारताना सावकारे यांनी आपल्या दालनात विधिवत पूजादेखील केली. शासकीय कार्यालयात पूजा केल्याने या पूजेची चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली. तर वस्त्राsद्योग व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी असून उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येतील. वस्त्रोद्योग विभागातील विविध योजनांना गती द्यावी, अशा सूचना मंत्री सावकारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पर्यावरण विभागाचा कार्यभार स्वीकारताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, राज्यातील घनकचरा व्यवस्थापन, पाणी, हवा प्रदूषण नियंत्रण, नदी व तलाव संवर्धन, पर्यावरण जतन व संवर्धन जनजागृतीपर उपक्रम, राज्यस्तरीय नदी संवर्धन योजना, सागरतटीय विशेष राखीव क्षेत्र नियमन, स्थानिक स्वराज्य संस्थाचे घनकचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिक निर्मूलन, राज्य नदी संवर्धन योजना, महाराष्ट्र पर्यावरण माहिती प्रणाली केंद्र, ‘सृष्टी मित्र’ पुरस्कार, ‘माझी वंसुधरा अभियाना’ची प्रभावी अंमलबजावणी करणे, पर्यावरणपूरक वातावरणासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे, जैविक कचरा नियमावली, पर्यावरण जतन व संवर्धनासाठी राज्य, जिल्हा व ग्रामपातळीवर समित्या कार्यरत करणे, पर्यावरण क्लब स्थापन करणे, पाणथळ जागांचे संवर्धन यासाठी विशेष प्रयत्न करणे याबाबत सविस्तर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.