
मंगळवार पेठेतील अत्यंत मोक्याचा डॉ. आंबेडकर भवनला लागून असलेला म्हणजे ससून डेड हाऊसच्या अगदी समोरचा सव्वादोन एकरचा सुमारे 400 कोटी रुपयांचा भूखंड एका बडय़ा मंत्र्याशी संबंधित असलेल्या बिल्डरला अवघ्या 60 ते 70 कोटीत विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हा सरकारी भूखंड सध्या एमएसआरडीसीच्या ताब्यात असून तो बिल्डरला देण्याच्या विरोधात पुण्यातील अनेक संस्था आणि संघटनांचा तीव्र विरोध झुगारून हा भूखंड बिल्डरच्या घशात घातला जात आहे. पूर्वी हा भूखंड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा होता. त्यांनी तो रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एमएसआरडीसीला 99 वर्षांच्या लीजने दिला आणि रस्ते विकास महामंडळाने रिंग रोडला भाग भांडवल हवे म्हणून तब्बल 400 कोटींचा हा भूखंड एका मंत्र्याशी संबंधित अशा बिल्डरला अवघ्या 60 ते 70 कोटीत बहाल केल्याचे समजते.
हा भूखंड बिल्डरला देऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री आणि जिह्याचे पालकमंत्री अजित पलार यांनादेखील निवेदन देण्यात आले होते. गेल्याच आठवडय़ात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांनी या भूखंडसंदर्भात अजित पवार यांना प्रश्न विचारला असता याबद्दल मी माहिती घेतो असे सांगितले होते. मात्र तरीदेखील या भूखंडाचे श्रीखंड महायुती सरकारमधील सत्ताधारी खात असल्याचे चित्र पुणेकरांच्या समोर आले आहे.
कॅन्सर रुग्णालयासाठी जागेची होती मागणी
अत्यंत गोपनीय आणि गुपचूप व्यवहार करून हा सरकारी भूखंड बिल्डरला देण्यात आला यामागे सरकारमधील एक बडा मंत्री असल्याचे सांगण्यात येते. या भूखंडाला लागूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आहे. त्याच्या विस्तारीकरणासाठी हा भूखंड मिळावा म्हणून पुण्यातील सर्व आंबेडकरी चळकळीतील संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. ससून हॉस्पिटलला कॅन्सर रुग्णालय उभारण्यासाठी ही जागा द्यावी अशी मागणी झाली होती. त्याचबरोबर सर विश्वेश्वरय्या यांच्या स्मारकासाठी ही जागा मिळावी म्हणून आंदोलनदेखील करण्यात आले होते. हे सगळे होत असताना त्यांना डावलून हा भूखंड एका बिल्डरला अवघ्या 60 ते 70 कोटी रुपयांच्या मूल्यावर देण्यात आल्याने आश्चर्य क्यक्त होत आहे.