महायुतीतील नेत्यांच्या वाहनचालकांची हाणामारी; हसन मुश्रीफ यांच्या पुरपाहणी दौऱ्यातील घटना

कोल्हापूर जिल्ह्यात उद्भवलेल्या पुरस्थितीची पाहणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून सुरू आहे. इचलकरंजी येथील पुरग्रस्तांची भेट घेत असताना शुल्लक कारणावरून मिंधे गटाचे खासदार धैर्यशील माने आणि इचलकरंजीचे भाजप समर्थक अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे यांचे पुत्र व जिल्हा.परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे यांच्या वाहन चालकांची फ्रिस्टाईल हाणामारी झाली. कमरेचा बेल्ट काढून,अर्वाच्य शिवीगाळ करत ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. बराचवेळ त्यांच्यात हाणामारी सुरू होती. विशेष म्हणजे पोलिसांसमोरच ही घटना घडली आहे. घटनेचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांना लोकसभा निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडून विरोध करण्यात आला होता. माने यांच्या विरोधात राहुल आवाडेंची उमेदवारीही घोषित केली होती. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे आवाडे यांनी माघार घेतली होती. मात्र, शनिवारी या नेत्यांच्या वाहन चालकांमध्ये चांगलीच जुंपली होती. या हाणामारीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क करण्यात येत आहेत.

पालकमंत्री हसन मुश्रीफ विविध नेत्यांसोबत पूरग्रस्त भागात पाहणी दौरा करत आहेत. पंचगंगा नदीचा पुर पाहून, इचलकरंजी नाट्यगृह परिसरात पुरबाधितांना भेट देण्यास आले असता, खासदार माने आणि राहुल आवाडे यांचे वाहनचालक वाहन पार्क करत होते. त्यावेळी त्यांची वाहने एकमेकांना घासली. यावरून दोन्ही वाहनचालकांमध्ये वाद सुरू झाला. शिविगाळ आणि बघुन घेण्याची भाषा करत या वादाचे रूपांतर फ्रिस्टाइल हाणामारीत झाले. कमरेचा बेल्ट काढून ते एकमेकांवर धावत गेल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या सर्व प्रकार पोलिसांसमोरच सुरू होता. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही वाहनचालकांना रोखले. त्यानंतप तणाव कमी झाला. मात्र, याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कसलीही नोंद झाली नव्हती.