
राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करत आणलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकडून आता महायुती सरकार पैसे वसूल करणार आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ने सूत्रांच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार, राज्य सरकार लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या उत्पन्नाबाबत जाणून घेण्यासाठी आता प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे. तसेच इतर विविध योजनेच्या माध्यमातून गैरफायदा घेत असल्यास त्याचीही तपासणी होणार आहे.
याचबाबत बोलताना आज पुण्यात पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, निवडणुकीआधी आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह लाडक्या बहिणीसाठी जेही फॉर्म येत आहेत, ते घेण्याचं ठरवलं होतं. मात्र श्रीमंत महिलांनीही या योजेनसाठी अर्ज केले होते, हे निवडणुकीनंतर समजलं, असं ते म्हणाले.