भाजप महायुती सरकारकडून विरोधी पक्षातील विशेष नेत्यांना VVIP ट्रिटमेंट? जयंत पाटील, उत्तम जानकरांच्या सेवेत सरकारी अधिकारी!

महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदावरून आणि प्रशासकीय पीए – पीएस आणि ओसडी नेमण्यावरून वाद रंगला आहे. आता आणखी एक मोठा ट्विस्ट आला आहे. भाजप महायुती सरकारकडून विरोधी पक्षातील विशेष नेत्यांना VVIP ट्रिटमेंट दिली जातेय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सरकारी आस्थापनेवर असणारा अधिकारी उसणवारी तत्त्वावर थेट विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांच्या सेवेत दाखल असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सेवेत राज्य सरकारचे तब्बल दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांना अजित पवारांच्या मंत्र्यांकडून ही स्पेशल ट्रिटमेंट दिली जातेय. तर जयंत पाटलांसाठी उद्योग खात्याचाही एक अधिकारी सेवेत असल्याचे समोर आले आहे.

विरोधी गटातील मोठ्या नेत्यांसाठी सरकारी पगाराचे दोन अधिकारी सेवेत

गौरव भोसले – सहाय्यक कक्ष अधिकारी, उद्योग, उर्जा व कामगार विभाग यांची इंद्रनील नाईकांकडून नियुक्ती झाल्याची माहिती आहे. तर संजय पाटील – उद्योग विभाग कक्ष अधिकारी यांनाही जयंत पाटलांच्याच सेवेत नेमले आहे. विधानसभा निकालानंतर EVM सरकार असं वारंवार हिणवणाऱ्या उत्तम जानकरांनाही महायुती सरकारने स्पेशल गिफ्ट दिलंय का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. उत्तम जानकरांचा स्वीय सहाय्यक म्हणून ग्रामविकास खात्याचा अधिकारी जानकरांच्या सेवेत दाखल आहे. हनुमंत सगरे, ग्राम पंचायत अधिकारी, माळशिरस इथे सरकारी पगारावर उत्तम जानकरांच्या सेवेत आहेत.