महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचाही फज्जा; नियोजनाअभावी अर्ज दाखल करताना बहिणींचे हाल

>> प्रसाद नायगावकर

लोकासभा निवडणुकीत भाजप, मिंधे आणि अजित पवार गटाच्या महायुतीने राज्यात सपाटून मार खाल्ला आहे. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. या निकालानंतर आता मते मिळवण्यासाठी सरकारला जनतेची आठवण होत आहे. आगामी विधानसभेत डोळ्यासमोर पराभव दिसत असल्याने मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. पण नियोजन शून्यतेमुळे महायुती सरकारच्या या योजनेचाही फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. या योजनेसाठी अर्ज दाखल करताना लाडक्या बहिणींचे अतोनात हाल होत आहेत.

लाडकी बहीण योजना एक जुलैपासून सुरू करण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी 15 जुलैपर्यंतच अत्यल्प वेळ देण्यात आला आहे. यामुळे कागदपत्र तयार करण्यासाठी महिलांची गर्दी उसळली आहे. तलाठी तसेच सेतू केंद्रावर पहाटेपासूनच रांगा लागल्याचे चित्र जिल्ह्यातील अनेक भागात होते. राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. 21 ते 60 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. योजनेसाठी एक ते 15 जुलै अर्ज करण्याचा कालावधी निश्‍चित केला आहे. त्यासाठी उत्पन्न तसेच अधिवास प्रमाणपत्राची अट आहे. योजनेत अर्ज दाखल करण्यासाठी केवळ 14 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. अनेकांकडे उत्पन्नाचा तसेच अधिवास प्रमाणपत्र नाही. यामुळे पहिल्याच दिवशी तलाठी कार्यालयात उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी शेकडो महिला आल्याने लांबच लांब रांगा होत्या. तशीच स्थिती सेतू केंद्रावर दिसून आली. अधिवास प्रमाणपत्र तसेच अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. कमी कालावधीमुळे गर्दी वाढल्याने प्रशासनालाही घाम फुटला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी, अधिवास प्रमाणपत्र तसेच उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी तहसील कार्यालयातील सेतू केंद्रावर मोठी गर्दी झाली होती. गर्दी अनियंत्रित होण्याचा धोका वाढला होता. शिवाय, रस्ता ब्लॉक झाला होता. यावर नियंत्रणासाठी पोलिसांना पाचरण करण्यात आले आहे. योजनेच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी जिल्हाभरातील तलाठी, सेतू तसेच तहसील कार्यालयात महिलांची गर्दी लक्षणीय होती. पहिल्याच दिवशी झालेली गर्दी पाहता महसुल प्रशासनाची तारांबळ उडाली असून घाम फुटला आहे. याचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सोमवारी सायंकाळी तातडीने बैठक घेतली आहे.

लाडक्या बहिणींची आर्थिक पिळवणूक , एजंट झाले सक्रिय
शनिवार आणि रविवार सुट्टी आल्यामुळे सोमवारी पटवारी, तलाठी सेतू तसेच झेरॉक्स दुकानांवर महिलांची एकच गर्दी उडाली झाली आहे. त्यांना लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्र कोणती आणि ती कोणत्या तारखेपर्यंत द्यावायची हे माहित नसल्यामुळे तहसील आणि सेतू कार्यालयात गर्दी होत आहे. याचा गैरफायदा घेत तलाठी कार्यालयात उत्पन्नाच्या दाखल्यासाठी 50 रुपये दयावे लागत आहे. तर झेरॉक्सवाले 2 रुपयाच्या झरॉक्सचे 10 रुपये घेत असल्याची महिलांची तक्रार आहे. शिवाय महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन काम करून देण्यासाठी एजन्टही सक्रिय झाल्याचे सांगण्यात येत आहे.

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणलेली ही योजना आहे. सरकारने या योजनेसाठी महिलांना अर्ज भरण्यासाठी अतिशय कमी वेळ दिला आहे . लाभार्थी महिलांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात लाखांवर असू शकते. त्यामानाने शासकीय यंत्रणा अतिशय तोकडी आहे. यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळेल. याशिवाय सरकारच्या हेतूवर शंका निर्माण झाली आहे. अत्यंत अल्प काळासाठी योजनेचा कालावधी देऊन लाभार्थी संख्या कमी करायची असा त्यांचा मानस आहे. अल्प संख्येत महिलांना या योजनेचा फायदा द्यायचा आणि आणि योजना अमलात आणली म्हणून आपले नाव करून घायचे हा त्यांचा हेतू दिसत आहे
– विश्वास नांदेकर,माजी आमदार,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यवतमाळ जिल्हा प्रमुख