मतांची चोरी करून महाराष्ट्रात महायुती सरकारची स्थापना; रमेश चेन्नीथलांचा भाजपवर हल्ला

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष मोठा विजय मिळवून राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला, पण विधानसभा निवडणुकीत मात्र यश आले नाही. महायुतीने मतांची चोरी करून सरकार बनवले, अशा शब्दांत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज भाजपवर हल्ला चढवला.

बिर्ला मातोश्री सभागृहात आयोजित कार्यक्रमात काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, प्रवक्ते अतुल लोंढे आदी नेते उपस्थित होते.

विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला, पण विधानसभेत मात्र काँग्रेसला अपयश आले. आता पुन्हा जोमाने काम करावे लागणार आहे. संख्याबळ महत्त्वाचे नाही तर लढण्याची इच्छाशक्ती लागते आणि काँग्रेस पक्ष कधीच संपणारा नाही.

आता लढायचे दिवस

नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही त्यांच्या भाषणात भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजप सक्षम नाही म्हणूनच त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पह्डले. काँग्रेसमधील नेत्यांना भाजपात प्रवेश दिला. आपल्याला संघटना बांधायची आहे. आपल्याकडे नेतृत्व आहे, पण कार्यकर्त्यांची एक एक कडी जोडायची आहे. कार्यकर्ता कार्यकुशल बनवायचा आहे. लढाईतील आयुधे बदलली आहेत. रस्त्यावर उतरून लढावे लागेल. आता रडायचे नाही तर लढायचे दिवस आहेत, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.