
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयावरून माघार घेणाऱया महायुती सरकारच्या विरोधात राज्यभर वातावरण तापू लागले आहे. सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. भाजपच्या जाहीरनाम्यातही याचा उल्लेख होता. मात्र राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असल्याने कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱयांनी 31 मार्चपर्यंत कर्जफेड करण्याचे आवाहन नुकतेच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवार यांच्या वक्तव्याची री ओढत कर्जमाफी देता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शेतकऱयांमध्ये नाराजी उफाळून आली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूरमध्ये सरकारचा निषेध करत येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 7 वाजता काळी गुढी उभारली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीस यांनी 100 दिवसांच्या आत शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु सरकारने घूमजाव करत कर्जमाफी देता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यातच शक्तिपीठ महामार्गाचे काम रेटून शेतकऱयांना देशोधडीला लावण्याची सरकारची योजना आहे. या महामार्गामुळे कोल्हापुरात महापुराचा धोका वाढणार आहे. शेतीसह सामान्यांचे जनजीवन उद्ध्वस्त होणार असल्याने या विरोधात आनंदाचा दिवस निराशेने साजरा करत असल्याचे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीच्या मुद्दय़ावरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हेदेखील आक्रमक झाले आहेत. 11 एप्रिलला आमदाराच्या घरांसमोर टेंभे पेटवून आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
अंथरुण पाहून आश्वासने द्यायची होती
शेतकरी नेते अजित नवले यांनी कर्जमाफी द्यायला पुरेसे पैसे नव्हते तर आश्वासन कशाला दिले, असा सवाल केला आहे. खासदारांचे पगार वाढवायला, उद्योजकांचे कर्ज माफ करायला पैसे आहेत, परंतु शेतकऱयाला वाऱयावर सोडले जात आहे. सरकारने अंथरुण पाहून आश्वासने द्यायला हवी होती. शेतकऱयांचा विश्वासघात केल्यास शेतकरी संप पुकारतील, महाराष्ट्र बंद पाडतील, असा इशारा त्यांनी दिला.