महाराष्ट्र हरला… अदानीराष्ट्र जिंकले! महायुतीला पूर्ण बहुमत

राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण करून घटनाबाह्य पद्धतीने सत्तेत आलेल्या मिंधे-भाजप महायुती सरकारने पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे धोरण सातत्याने राबवले. लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर लाडका कंत्राटदार आणि लाडक्या उद्योगपतीसाठी काम करणाऱया मिंधे सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध लाभांच्या योजनांतून पैशांची भुरळ घातली. यामध्ये राज्याचा सर्वांगीण विकास, महागाई, महिला सुरक्षेचा प्रश्न, वाढती बेरोजगारी, राज्यातील उद्योग गुजरातला पळविण्याचा मुद्दा असो की धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईतील मोक्याचे भूखंड अदानीच्या घशात घालण्याचा सुरू असलेला प्रयत्न यांसारखे मुद्दे मागे पडत महाराष्ट्र हरला आणि अदानीराष्ट्र जिंकले.

महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा जोरदार संघर्ष निवडणूक प्रचारादरम्यान पाहायला मिळाला. 288 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राज्यात सरासरी 66 टक्के मतदान झाले. राज्यातील आजवरच्या मतदानाची वाढलेली टक्केवारी पाहता राज्यासह देशातील जनतेचे निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागले होते. महायुतीला 230, तर महाविकास आघाडीला 46 आणि 12 जागांवर अपक्ष व इतर पक्षांचे उमेदवार विजयी झाले. मतदानानंतर आलेले एक्झिट पोलचे अंदाज पाहता महायुती व महाविकास आघाडीत अटीतटीची लढाई होईल अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र निवडणुकीचा निकाल हा सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूंसाठी आश्चर्यकारक आहे.

सरकारवर विरोधी पक्षाचा धाक महत्त्वाचा

विरोधी पक्षनेतेपद लोकशाहीत महत्त्वाचे असते. विधिमंडळात विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिलेला असतो. विरोधी पक्षनेता सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवून असतो, सरकारच्या धोरणांवर जाब विचारू शकतो, सरकारच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे काम विरोधी पक्षनेता करतो असतो. विधानसभेच्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा आणि प्रस्तावांवर विरोधी पक्षनेत्याची भूमिका महत्त्वाची असते. विधिमंडळात विरोधकाचा आवाज नसेल तर सरकार मनमानी कायदे करू शकतो. त्यामुळे सरकारवर विरोधी पक्षाचा धाक असणे महत्त्वाचे आहे.

  • महायुती 230
  • भाजप 132
  • शिंदे गट 57
  • अजितदादा 41

 

  • महाविकास आघाडी 46
  • शिवसेना 20
  • काँग्रेस 16
  • राष्ट्रवादी 10

आदित्य ठाकरे – वरळी

सुनील राऊत – विक्रोळी

वरुण सरदेसाई – वांद्रे

संजय पोतनीस – कलिना

अजय चौधरी – शिवडी

मनोज जामसुतकर – भायखळा

सुनील प्रभू – दिंडोशी

हारुन खान – वर्सोवा

अनंत नर – जोगेश्वरी