रत्नागिरीत महावितरणला थकबाकीचा शॉक; 20 कोटी रूपयांची वीजबीले थकली

महावितरणच्या वीजबील थकबाकीचा रत्नागिरी जिल्ह्याचा आकडा कमालीचा वाढला आहे.जिल्ह्यातील 52 हजार 845 ग्राहकांकडे तब्बल 20 कोटी 2 लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजबील वसुली मोहीम राबविण्यात येत असून वीजबील थकविणाऱ्यांची वीजजोडणी तोडण्यात येत आहे. जिल्ह्यात घरगुती ग्राहकांसह वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी, पथदीप, सार्वजनिक पाणीपुरवठा, शासकीय कार्यालयांकडील थकबाकी वाढली आहे.सर्वाधिक थकबाकी सर्वच ठिकाणच्या पथदीपांची आहे. शासकीय कार्यालयाच्या वीजबीलांची थकबाकी वसुल करणे हे महावितरणसाठी अवघड काम बनले आहे.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पथदीपांसाठीची 10 कोटी 14 लाखांची थकबाकी आहे. दरवर्षी 31 मार्चपर्यंत बिले भरण्यात येत असल्यामुळे येत्या काही दिवसांतही थकबाकी भरण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वीजबीले त्वरीत भरा आणि कारवाई टाळा असे आवाहन महावितरण करत आहे.महावितरण स्पीकर वरून जनजागृती करत आहे.

सामान्यांची तात्काळ वीजतोडणी…मग इतकी थकबाकी कशी?
सर्वसामान्य वीजग्राहकाने दोन-तीन महिने वीज बील भरले नाही तर त्याची वीज जोडणी तात्काळ तोडण्यात येते. मात्र बड्या मंडळींची, शासकीय कार्यालयांची वीजबील थकबाकी असूनही त्यांची वीजजोडणी तोडली जात नाही. दोन -तीन महिने वीज बील भरले नाही तर सामान्य ग्राहकांची वीज जोडणी तोडली जाते मग थकबाकी 20 कोटी रुपयांच्या घरात कशी पोहोचली हा प्रश्न उपस्थित होत आहे.