चंद्रपूरमधील नकोडा गावातील रोहित्र दुरूस्तीच्या बहाण्याने वीज कर्मचाऱ्याला गावात बोलावून त्याला विद्युत खांबाला बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्याला तब्बल दोन तास बांधून ठेवले होते. यावेळी नकोडाचे सरपंच किरण बांदुरकरसह तिघांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्या कर्मचाऱ्याने केला असून या प्रकरणी सरपंच किरण बांदूरकरसह तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा विडिओ समाजमाध्यमात वायरलं झाल्या ने या घटनेच्या सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.
वीज कर्मचारी सुरज परचाके घुग्घूस येथे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांच्याकडे उसगाव आणि नकोडा या दोन गावांचे विद्युत मेंटनन्सचे काम करण्याची जबाबदारी आहे. नकोडा गावातील विद्युत पुरवठा अनियमित होता. त्यामुळे तेथील गावकरी वैतागले होते. रविवारी सुरज परचाके नेहमी प्रमाणे उसगाव येथे निघाले होते. मार्गात नकोडा येथील सरपंच किरण बंदुरकर यांनी त्यांना एसीसी सिमेंट कंपनी जवळ अडवलं. यावेळी बांदुरकर यांनी डीपी जवळ एक काम आहे, नकोड्याला चला असे सांगितले. नकोड्याला गेल्यावर त्यांनी परचाके यांना ओढणीने विद्युत खांबाला बांधले. विद्युत खांबाला बांधताना तिथे मोठ्या संख्येने गावकरी जमा झाले होते. या दरम्यान सरपंचांनी मारहाण केल्याच्या आरोप सुद्धा कर्मचाऱ्याने केला आहे. साधारणत: दोन तास त्यांनी कर्मचाऱ्याला बांधून ठेवलं होतं. या प्रकारची माहिती घुग्घुस महावितरणचे सहायक अभियंता नयन भटारकर यांना मिळाली. भटारकर यांनी घटनास्थळी जाऊन परचाके यांना सोडविले. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली. तक्रारीवरून सरपंचावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नकोडा गावातील विद्युत पुरवठा अनियमित होता. यातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. पुढील तपास घुगुस पोलीस करीत आहेत.