तुम्ही मते मागायला एका विचाराने येता आणि मतदान दिल्यानंतर तुम्ही दुसऱया रस्त्याने जाता हे वागणे शहाणपणाचे नाही. ज्यांना जनतेने, पक्षाने मान दिला त्या नेत्यांनी आमचा घात केलाय.
महाराष्ट्र सध्या चुकीच्या लोकांच्या हातात आहे. हे चित्र बदलवण्याच्या दृष्टीने लोकसभेत मतदारांनी निकाल दिला. लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 31 लोकांना शक्ती देऊन वेगळा इतिहास घडवला. आता लवकरच विधानसभेची निवडणूक जाहीर होईल. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 225 पेक्षा जास्त जागा जिंकून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
लातूर जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. महायुतीचे पानिपत होईल याचा स्वप्नातसुद्धा कोणी विचार केला नसेल; पण राज्यातील जनतेने महाविकास आघाडीच्या पारडय़ात मते टाकून शिंदे-फडणवीस-अजित पवार या त्रिमूर्तीला जोरदार झटका दिला. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 288 पैकी 225 जागा जिंकेल असे चित्र आहे. त्यामुळे जास्तीत जास्त काम करणे ही तुमची जबाबदारी आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
ज्यांना मान दिला त्यांनी घात केला
उदगीर आणि देवळाली या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले होते; मात्र त्यांनी मतदारांचा घात केला. तुम्ही मते मागायला एका विचाराने येता आणि मतदान दिल्यानंतर तुम्ही दुसऱया रस्त्याने जाता हे वागणे शहाणपणाचे नाही. ज्यांना जनतेने, पक्षाने मान दिला त्या नेत्यांनी आमचा घात केलाय, अशा शब्दांत शरद पवार यांनी अजित पवार गटावर हल्ला चढवला.
विलासरावांची झाली आठवण
खासदार सुप्रिया सुळे यांनी विलासराव देशमुख यांची आठवण काढली. त्यांनी मुख्यमंत्री असताना आघाडीचा धर्म पाळल्याची आठवण त्यांनी काढली. लातूर हा महत्त्वाचा जिल्हा असल्याचे त्या म्हणाल्या. सुधाकर भालेराव यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी माणसाला गद्दारी आवडत नाही – जयंत पाटील
मराठी माणसाला सर्व गोष्टी सहन होतात. पण फसवलेले सहन होत नाही. तुम्ही कोणाला फसवले, त्यानंतर तुम्ही त्या माणसावर सोन्याच्या नोटांचा वर्षाव केला तरी मराठी माणूस बघत नाही. कारण मराठी माणसाला गद्दारी केलेली कधीही आवडत नाही. गद्दारीचा नामशेष करण्याची जबाबदारी आम्ही तुमच्यावर विश्वासाने दिलेली आहे. तुम्ही विजय खेचून आणाल आणि गद्दारांना धडा शिकवाल, असे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.